Ahmednagar News : बिबट्याचा ग्रामीण भागातील वावर वाढला आहे. पशुधनावर हल्ला करून फस्त करणे, माणसांवर हल्ले करणे आदी गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. दरम्यान आता बिबट्यानेही कमालच केली असल्याचे एक घटना समोर आली आहे.
एका शेतकऱ्याने आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी तार कंपाउंड लावले. पण बिबट्याने जमीन उकरत बिळ करून त्यातून आत प्रवेश केला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील चांदेकासारे परिसरात घडली.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकासारे परिसरात गेल्या दहा दिवसापासून बिबट्या पाळीव प्राण्यांची शिकार करत आहे. आहेर वस्ती परिसरात बुधवारी रात्री बिबट्याने एका शेतकऱ्याच्या जनावरांच्या तार कंपाऊंडमध्ये बीळ पाडून आत प्रवेश केला. त्यानंतर तेथे १५ हजार रुपये किमतीच्या बोकडाची शिकार केली. यामुळे परिसरातील पशुपालक हवालदिल झाले आहेत.
बुधवारी रात्री बिबट्याने बोकडाची शिकार केल्यानंतर सकाळी शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वन विभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत शिकार झालेल्या बोकडाचा पंचनामा केला. मात्र पशुपालकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यासमोरच पिंजरा कधी लावणार, अशी विचारणा केली.
तेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा लावण्या संदर्भात वरिष्ठांकडे मागणी करू, असे सांगितले. याच बिबट्याने ३० मार्च रोजी सुरेश भिमाजी होन यांची कालवड तर संजय जायपत्रे यांची शेळी फस्त केली होती. हा बिबट्या जेरबंद करण्यासाठी तातडीने या परिसरात पिंजरा लावावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
जिल्हाभरात अनेक घटना
मानवाने वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट केला व वन्यप्राण्यांनीही मानवी वस्ती जवळ केली. आपली भूक भागवण्यासाठी हे वन्यप्राणी आता मानवी वस्तीत दाखल होतात. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात अगदी शहरी भागातही बिबट्याचे दर्शन होत आहे.
जिल्हाभरात मानवी वस्तीत शिरत धुमाकूळ घालण्याच्या अनेक घटना घडत आहेत. अकोले तालुक्यात तर काही महिन्यांपूर्वी बिबट्याने थेट घरातून महिलेस ओढून नेण्यापर्यंतची घटना घडली होती. या सर्व घटना चिंताजनक आहेत.