अहमदनगर बातम्या

MLA Nilesh Lanke : आमदार निलेश लंके यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम कायम

Published by
Ahmednagarlive24 Office

MLA Nilesh Lanke : निलेश लंके हे परत शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्या तरी देखील या चर्चांना ११ मार्चपासून विशेष ऊत आला आहे. ११ मार्चलाच निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात जातील अशी बातमी वेगाने व्हायरल झाली होती. मात्र, शरद पवार आणि निलेश लंके या दोन्हींनी हे वृत्त फेटाळले होते.

काल पाच वाजता त्यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात येऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आणि खासगी चर्चेदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तिथे उपस्थित होते. त्यानंतर कोव्हिड काळातील लंके यांना आलेल्या अनुभवावर आधारित ‘मी अनुभवलेला कोव्हिड’ या पुस्तकाचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

अहमदनगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून लोकसभा निवडणुकीची तयारी करणारे निलेश लंके काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात सहभागी होतील अशी बातमी सकाळी समोर आली. चार वाजता निलेश लंके हे पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सहभागी होतील अशी बातमी समोर आली होती.

पण, आजही निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात सहभागी झाले नाहीत. ज्येष्ठनेते शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पूर्ण झाले मात्र त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही. म्हणजे आमदार निलेश लंके यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम कायम राहिला.

यावेळी निलेश लंके म्हणाले, पवारसाहेबांची पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने भेट घेतली. देशाच्या विविध घडामोडीत पवार साहेबांचा सिंहाचा वाटा असतो. कोव्हिड काळात त्यांच्या नावानेच मी कोव्हिड सेंटर सुरू केले होते. आज त्याच अनुभवांचं कथन मी पुस्तकात केले आहे.

मी नेहमीच शरद पवार यांच्या विचारधारेवरच काम करत आलोय. त्यांचे नेतृत्व मी कधीही सोडलेले नाही, पवारसाहेबांचे स्थान माझ्या हृदयात आहे. ते कुणीही काढू शकत नाही. शरद पवार यांच्यासोबत खासदारकी आणि इतर निवडणुकीची आज चर्चा केली नाही. असे सांगत त्यांनी प्रवेशाच्या वृत्ताला बगल दिली.

Ahmednagarlive24 Office