Ahmednagar Politics : सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. आपापल्या पद्धतीने अनेक इच्छुकांनी आपली बांधणी सुरू केली असून यासाठी दैनंदिन विविध कार्यक्रमास हजेरी लावताना दिसून येत आहेत. याला श्रीरामपूर मतदारसंघ देखील अपवाद नाही. त्यामुळे जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्याचे राजकारण सर्वश्रुत आहे.
श्रीरामपूर मतदारसंघात देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली. यात प्रामुख्याने काँग्रेसकडून विद्यमान आमदार लहू कानडे यांनी, तर ससाणे गटाचे हेमंत ओगले यांनीही तयारी सुरू केली आहे. मात्र उमदवारी देण्याचा निर्णय हा हायकमांडकडून घेतला जात असल्याने काँग्रेस पक्षाकडून आमदार कानडे यांना उमदवारी मिळते का ओगले याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असला तरीही ओगले हे कानडे यांच्यासाठी पक्षांतर्गत एकमेकांचे स्पर्धक म्हणून समोरासमोर उभे ठाकले आहेत. दोघांनीही जोरदार तयारी सुरू केली असून नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला जात आहे.
काँग्रेसचे माजी आमदार स्व. जयंत ससाणे यांना नगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील चतुर राजकारणी म्हणून पाहिले जात होते. त्यांनी आपल्या स्वभावामुळे श्रीरामपूर मतदारसंघावर पकड निर्माण केली होती. (स्व.) गोविंदराव आदिक यांचे समर्थक म्हणून सुरवातीला त्यांना ओळखले जायचे.
त्यानंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे समर्थक म्हणूनही त्यांनी श्रीरामपूरचे नगराध्यक्षपद सांभाळले. कॉंग्रेसफुटीनंतर निर्माण झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मुरकुटे यांच्यासोबत जाण्याचे टाळून त्यांनी कॉंग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
मुरकुटे यांचा पराभव करून ते दोन वेळा श्रीरामपूरचे आमदार झाले. आजही श्रीरामपूरमध्ये माजी आमदार स्व.जयंत ससाणे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. माजी आमदार स्व.जयंत ससाणे यांच्या नंतर त्यांचे सुपुत्र जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे हे नेतृत्व करीत आहेत.
२००९ मध्ये श्रीरामपूर मतदार संघ राखीव झाल्यानंतर स्व. ससाणे यांनी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना दोनदा आमदार म्हणून निवडून आणले. मात्र, श्रीरामपूर नगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत कांबळे यांनी ससाणे गटाची साथ सोडत त्यांचे कट्टर राजकीय विरोधक राष्ट्रवादीच्या अनुराधा आदिक यांना साथ दिली.
२०१९ च्या निवडणुकीत कांबळे यांनी काँग्रेसला रामराम करीत महायुतीकडून निवडणूक लढवली. त्यामुळे काँग्रेसची जागा खाली झाली. या जागेवर हेमंत ओगले व आमदार कानडे यांच्यात रस्सीखेच झाली. मात्र, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी ससाणे व कानडे यांच्यात काही तडजोडी करून कानडे यांच्या पारड्यात उमेदवारी टाकली. आ. लहु कानडे यांना नियोजनबध्द पध्दतीने विजयी करुन विखे पाटलांची कोंडी केली.
दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष करण ससाणे व माजी आ. भानुदास मुरकुटे यांची निवडणुकीत होणारी कुस्ती टाळून दोघांनाही जिल्हा सहकारी बँकेचे संचालक करून श्रीरामपूर तालुक्यातील राजकारणाला वेगळी दिशा दिली. मात्र काही वर्षांनी कानडे व ससाणे गटात दुरावा निर्माण झाला. दरम्यान, आता उमेदवारीसाठी काँग्रेसच्या ससाणे गटाने हेमंत ओगले यांच्यासाठी कंबर कसली असून मोर्चेबांधणी सुरू केली.
विद्यमान आमदारांवर मतदासंघांत नाराजी आहे. पक्षाचे तिकीट आपल्यालाच मिळणार याची आपल्याला खात्री असल्याने आपण निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थीतीत आपण निवडणूक लढवणार असल्याचे हेमंत ओगले सांगत आहेत . तर दुसरीकडे आपण पाच वर्षे मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केलेली आहेत.
त्यामुळे नागरिक आपल्यावर खुश आहेत. पक्षवाढीसाठी प्रयत्न केलेले आहेत, श्रीरामपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तालुक्याच्या विकासासाठी गट-तटाचे राजकारण न करता सर्वांसाठी आमदारकीचे दार नेहमी उघडी ठेवले. त्यामुळे पक्ष विद्यमान आमदार म्हणून आपलाच विचार करेल असे आमदार लहू कानडे हे सांगत आहेत. आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.