राज्यातील कॉग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाची दिशाभूल करुन सत्‍तेसाठी लाचारी पत्करली – आ.राधाकृष्ण विखे पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा फक्त सता वाटपाचा कार्यक्रम होता, यामध्ये कुठेही किमान समान कार्यक्रम नव्हता.

राज्यातील कॉग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाची दिशाभूल करुन सत्‍तेसाठी लाचारी पत्करल्याचेच आता समोर आले असल्याची खोचक टिका भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबत दिलेल्या पत्राबाबत आ.विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आणि कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवरही सडकून टिका केली. राज्यातील जनतेला महाविकास आघाडी सरकारचा फक्त सता वाटपाचा कार्यक्रम पाहीला मिळाला.

यांचा समान कार्यक्रम कुठे दिसलाच नाही हेच काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या पत्रावरून उघड झाले असल्याचे विखे पाटील म्हणाले. राज्‍यातील कॉंग्रेस नेत्‍यांनी सत्‍तेची लाचारी पत्‍करुन केंद्रीय नेत्‍यांची कशी फसवणूक केली हेच यातून स्‍पष्‍ट होत असल्‍याचे आ.विखे पाटील म्‍हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्‍या किमान समान कार्यक्रमाच्‍या अजेंड्यात ग्रामीण भागातील दलीत, वंचित, मागासवर्गीयांचे जीवनमान उंचावण्‍याचा कोणताही कार्यक्रम दिसला नाही, एक वर्षाच्‍या कार्यकाळात या सरकारने फक्‍त घोषणा केल्‍या, खोटी आश्‍वासने दिली त्‍यामुळे महाविकास आघाडी सरकारच्‍या किमान समान कार्यक्रमाची राज्‍यात कुठेही अंमलबजावणी झाल्‍याचे पाहायला मिळाले नाही.

आघाडीत सहभागी असलेल्‍या कॉग्रेस पक्षाच्‍या केंद्रीय नेतृत्‍वाला राज्‍याच्‍या मुख्‍यमंत्र्यांना पत्र पाठवुन याबाबतची व्‍यक्‍त करावी लागलेली खंत पुरेशी बोलकी आहे, भविष्‍यात याचे पडसाद उमटल्‍याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा आ.विखे पाटील यांनी बोलून दाखविली.

ग्रामपंचायत निवडणूकी संदर्भात बोलताना आ.विखे पाटील यांनी सांगितले की, पक्षीय स्‍तरावर या निवडणूका होत नसल्‍या तरी गावपातळीवर कार्यकर्ते या निवडणूकीत सक्रीयतेने सहभागी होतील.

संकटात सापडलेल्‍या शेतक-यांना महाविकास आघाडी सरकारकडुन न मिळालेली मदत आणि कोव्‍हीडच्‍या संकटात राज्‍यातील जनतेचे झालेले हाल लक्षात घेतले तर महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधातील प्रतिक्रीया या निवडणूकीतून राज्‍यात व्‍यक्‍त होईल आणि भाजपाला जनाधार मिळेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

अहमदनगर लाईव्ह 24