अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात कोणत्याही क्षणी आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा मागच्या काही दिवसापासून राज्याचे राजकीय वर्तुळात होत आहे.
दरम्यान सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार थोरातांच्या या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया गांधी या निर्णयाच्या बाजूने नाहीत.
दोन दिवसांपूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले होते.
आपल्या राजीनाम्याच्या चर्चेसाठीच थोरात दिल्लीला गेले होते अशी सुध्दा चर्चा राज्यात होत आहे. दरम्यान या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर सोनिया गांधींनीसुद्धा संबंधित नेत्यांची चांगलीच कानउघाडणी केलीय.
बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याची मागणी कोणी केली ? असा सवालच त्यांनी काँग्रेसच्या त्या नेत्यांना विचारला आहे. संकटाच्या काळात पक्षाला जास्त साथ देणाऱ्या नेत्यांपैकी बाळासाहेब थोरात एक आहेत असे सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.