अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत.
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील असणारी माहिती अर्नब गोस्वामी याला मिळाली कशी याची तात्काळ चौकशी होण्याच्या दृष्टीने अटक करण्यात यावी, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
राज्यभरात याबाबत काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने, निदर्शने करण्यात आली. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने तसे लेखी निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष निजामभाई जहागीरदार, खलील सय्यद, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, फारुखभाई शेख, एनएसयुआयचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, अल्पसंख्यांक अध्यक्ष अज्जूभाई शेख, सरचिटणीस नलिनीताई गायकवाड, सहसचिव नीता बर्वे, सेवादल अध्यक्ष कौसर खान,
क्रीडा अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, जरीना पठाण, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, सुजित जगताप, युवक काँग्रेसचे विशाल कळमकर, अनिसभाई चुडीवाल, सचिव मुबीन शेख, अन्वर सय्यद, सहसचिव ॲड.सुरेश सोरटे, शिक्षक काँग्रेसचे प्रसाद शिंदे, अजय मिसाळ, शरीफ सय्यद, महेश लोंढे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीला घटनेच्या तीन दिवस आधीच होती. असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे.
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामी कडे कशी आली ? देशाच्या संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली ? ही माहिती गोस्वामी या पत्रकाराला कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी कशी काय मिळाली ?
त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का ? असे अनेक प्रश्न निवेदनामध्ये उपस्थित करण्यात आले आहेत. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यावेळी बोलताना म्हणाले की, या व्हाट्सअप चॅटवरून स्पष्ट दिसते की अर्णब गोस्वामी याचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या सरकारमधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध असून
त्यांनी नियमांच्या पलीकडे जाऊन मदत केली असल्याचे स्पष्ट आहे. त्यासोबतच पुलवामा हल्ला हा मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे, तो निवडणूक जिंकेल, असा उल्लेखही यामध्ये आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर केला का ? असा सवाल उपस्थित करीत,
गोस्वामी आणि केंद्रातील भाजप सरकारचे साटेलोटे हा माध्यम स्वातंत्र्य आणि देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. या सर्व प्रकरणात अर्नब गोस्वामी एकटाच दोषी नाही तर केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपण घेतलेल्या शपथेचा भंग करून गोस्वामी याला व्यावसायिक फायदा करून देण्याचे,
तसेच त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. हा सुद्धा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा असून या प्रकरणात गोस्वामी याला मदत करणाऱ्या उच्चपदस्थ यांच्यावर देखील तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.