अहमदनगर बातम्या

नगर शहरात कॉंग्रेसचे लक्ष्य विधानसभा…‘भावी आमदार’ नावाचे फलक चर्चेत, काँग्रेस मंत्र्यांचाही पाठिंबा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 09 नोव्हेंबर 2021 :- राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत एकत्र असले तरी नगर शहरात कॉंग्रेस व राष्ट्रवादीत टोकाचे राजकीय वाद दिसून येतात.

विधानसभेची नगरची जागा राष्ट्रवादीकडे असूनही कॉंग्रेसने नगर शहरात विधानसभेची तयारी सुरु केल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष कार्यकर्ते व किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांवर काळेंचा उल्लेख ‘भावी आमदार’ असा करण्यात आला आहे.

त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. नगरमध्ये विधानसभेला शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी असा सरळ सामना दर पंचवार्षिकला रंगत असतो. यात मागील दोन निवडणुकांत राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. दिवंगत अनिलभैय्या राठोड यांच्या अकाली निधनामुळे शहरात मोठी राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे.

अशातच काळेंच्या माध्यमातून कॉंग्रेसने थेट विधानसभेचीच तयारी चालवल्याने नगरमध्ये तरी आघाडीत आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. सुनील केदार, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या आ. संग्राम थोपटे, आ. लहू कानडे, आ. डॉ. सुधीर तांबे या तीन-तीन आमदारांनी किरण काळे

यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांना शहरात हजेरी लावत काळे यांचे “राजकीय वजन” वाढविण्याचे काम केले आहे. या दौर्‍यात आयोजित एका बैठकीत ना. केदार यांनी ना. थोरात यांच्या उपस्थितीत ‘किरणला आम्हाला शहराचे सर्वेसर्वा करायचे असून

त्याच्या अंगाला गुलाल लागलेला पाहायचा आहे’ असे म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेल्या भावी आमदार या बिरुदावलीला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष वेगळे लढल्यास राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा आ. संग्राम जगताप आणि किरण काळे यांच्यामध्ये थेट सामना रंगणार असल्याचे स्पष्ट सूतोवाच केले.

यामुळे काळे हे काँग्रेसचे विधानसभेसाठीचे उमेदवार असल्याचीच घोषणा मंत्री सुनील केदार यांनी केल्यामुळे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office