अहमदनगर बातम्या

बळीराजाला दिलासा ! या ठिकाणचा जनावरे आठवडे बाजार सुरू होणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील अनेक जिल्ह्यात जनावरांवर लाळ खुरकूत संकट ओढवल्याने जनावरांचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी 8 ऑक्टोबरला काढले होते.

जवळपास महिनाभर बाजार बंद राहिल्याने शेतकरी आणि बाजार समितीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र आता राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचा लोणी खुर्द येथील जनावरे व शेळी-मेंढी आठवडे बाजार सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

याबाबत माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा केला होता. अखेर याला यश आले असून बुधवार दि. 3 रोजी बाजार भरणार असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

दरम्यान जिल्ह्यात लाळ खुरकूत आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून जनावरे आठवडे बाजार बंदचा शासनाने घेतलेला निर्णयही योग्यच होता. संसर्गाचा प्रतिबंध करण्याबरोबरच राज्यव्यापी लसीकरण योजना राबवून त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले.

मात्र हा संसर्ग थांबल्याने शुक्रवारी जिल्हाधिकारी यांनी नवीन आदेश काढून जनावरांचे आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. लोणी खुर्द येथील जनावरे व शेळी-मेंढी बाजार देशभर प्रसिद्ध आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांबरोबरच मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा अशा अनेक राज्यांतून व्यापारी गायी,

बैल, शेळ्या, मेंढ्या इ. खरेदीसाठी लोणीला येतात. दिवाळीचा महत्त्वाचा सण तोंडावर असताना आर्थिक अडचणीतील शेतकर्‍यांना बाजार सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office