अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना ‘मॅट’ने दिलासा दिला आहे. राठोड यांच्या मोबाइलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांची बदली करण्यात आली होती.
याप्रकरणी यांनी ‘मॅट’कडे दाद मागितली होती. आठ दिवसांत नियुक्तीचे आदेश काढा, असे निर्देश ‘मॅट’ने गृहविभागाला दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी निलंबित आणखी एकाने ‘मॅट’कडे दाद मागितलेली आहे.
डॉ. राठोड यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नगर येथे ५ ऑक्टोबर २०२० रोजी पदभार घेतला. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक कोरोनाबाधित झाले. त्यानंतर पोलिस अधीक्षकांचा प्रभारीचार्ज डॉ. राठोड यांच्याकडे देण्यात आला.
८ ते २३ ऑक्टोबर २०२० या १५ दिवसांच्या कालावधीत डॉ. राठोड यांनी संगमनेर, श्रीरामपूरसह अनेक ठिकाणी बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई केली. अवैध धंदेचालकांनी डॉ. राठोड यांचा धसका घेतला होता.
शहरात बनावट भेसळ डिझेल घोटाळादेखील त्यांनी उघडकीस आणला. या कारवाईत सुमारे ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमध्ये २१ गुन्हे दाखल करून २७ जणांना अटक केली होती.
डिझेल घोटाळा उघडकीस आल्यानंतर काही काळातच डॉ. राठोड यांची बदली करण्यात आली होती. मात्र, आता राठोड यांना ‘मॅट’कडून दिलासा मिळाला आहे.