वळण : राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील प्रवरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर केमिकल युक्त दूषित पाण्यामुळे लाखो मासे मृत्यूमुखी पडले होते. परिणामी, नदीतील पाण्याची दुर्गंधी परिसरात मोठ्या प्रमाणात सुटली आहे. याबाबत दैनिक पुण्यनगरीने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची तात्काळ दखल घेत प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाथरे गावात भेट देत नदीतील दुषिता पाण्याचे नमूने घेवून वरिष्ठ कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठवले आहे
राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथून वाहणारी प्रवरा नदी ही एकेकाळी अमृतवाहिनी म्हणून ओळखली जायची अशा या शुद्ध पाणी असलेल्या नदीपात्रातील पाण्यामध्ये परिसरातील ओढ्या नाल्याच्या माध्यमातून परिसरातील व अन्य मार्गाने दूषित केमिकल युक्त पाणी यात येत असल्याने ही अमृतवाहिनी जणू काही विषवाहिनी झाल्याची भावना पाथरे ग्रामस्थांमध्ये व परिसरातील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. एकेकाळी पिण्यासाठी, वापरासाठी वापरले जाणारे नदीतील पाणी आता प्रचंड दुषित झाले आहे.
या पाण्यामुळे माणसचं काय जनावरांना देखील विविध आजारांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. हे पाणी वापरण्यास देखील योग्य नसल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर केमिकल युक्त व तेलकट वंगणासारखे काळेभोर पाणी आल्याने लाखो मासे मृत्यूमुखी पडले आहे. त्यांची दुर्गंधी व पाण्याची दुर्गंधीमुळे सुमारे दोन किलोमीटर पर्यंत घाण वास येत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करीत आहे.
याबाबत दोन दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते रणछोडदास जाधव यांनी सविस्तर व्यथा मांडली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या रविराज पाटील व अमित लाटे या क्षेत्रपाल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाथरे गावात भेट देवून या ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. तसेच मेलेल्या माशाचे व दूषित पाण्याचे छायाचित्र काढून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले आहे.
पूर्वी प्रवरा नदीचे पाणी वापरण्यासाठी व पिण्यासाठी योग्य होते. परंतु आता या पाण्यात केमिकल युक्त पाणी, दूषित पाणी येऊ लागल्याने आता हे पाणी पिण्याच्या लायकीचे तर नाहीच परंतु वापरण्यायोग्य राहिलेले नाही. जनावरे देखील पाणी पीत नाहीत, माणसे आजारी पडत आहे. विविध प्रकारचे आजार उद्भवत आहे. तसेच परिसरात प्रचंड डास झाले आहे. दुर्गंधी, घाण वासाचा कायमचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी गणी नागर नागरीकांमधून होत आहे.