अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- महापालिकेत अनेक वर्षापासून थकित असलेल्या छोट्या कामाच्या बीलांची देयके मिळत नसल्याने ठेकेदारांनी महापालिकेसमोर उपोषण केले.
या उपोषणात एस.बी. भोर, शहानवाज शेख, अमृत नागुल, विजय समलेटी, अमृत वन्नम, आकिज सय्यद, सर्फराज सय्यद, संजय डुकरे, मोहसीन शेख आदी ठेकेदार सहभागी झाले होते. महानगरपालिकेकडे महापालिकेच्या विविध लेखक शीर्षकांतर्गत शेकडो देयके अनेक वर्षापासून अदा करण्यासाठी प्रलंबित आहेत.
त्या मोठ्या रकमेच्या देयकांची रेग्युलर आणि थकीत अशी दोन ज्येष्ठता याद्या आहेत. यातील देयके ज्येष्ठता यादीनुसार अदा केले जात होते. तसेच दोन-तीन वर्षापासून नगरसेवक स्वच्छा निधी या लेखाशिर्षका खालील देयके क्रमवारी प्रमाणे वर्षातून सर्व देयके अदा करून संपवली जातात. परंतु 50 हजार पेक्षा कमी रकमेची देयके जेष्ठता यादी केलेली आहे.
परंतु ही छोटी देयके अदा करण्यात आलेली नाहीत. अशी छोटी कामे आपत्तीजनक व अत्यावश्यक परिस्थितीत स्थानिक अडचण निवारण करण्यासाठी करून घेण्यात आलेली आहे. अशी कामे करणारे ठेकेदार हे साधारण परिस्थितीतले आहेत त्यातच सन 2020 हे कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावात गेले.
यामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. ठेकेदारांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन उरलेले नाही. मुलांच्या शाळेची फी, कर्जाचे देणे, दैनंदिन गरजा व घरखर्च हे चालूच आहे. त्यामुळे ठेकेदारांची आर्थिक व मानसिक परिस्थिती बिघडत चालली आहे.
चालू वर्षी अहमदनगर महानगरपालिकेची कर वसुली ही उच्चांकी म्हणजे 50 कोटीच्या पुढे झालेली आहे. कर वसुली झाली की देयके अदा करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले येते. परंतु दरवर्षी पैसा महापालिकेच्या इतर खर्चापोटी खर्च होऊन ही छोटी देयके तशीच मागे पडत असल्याचे ठेकेदार आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.
डिसेंबर 2020 मध्ये आयुक्त यांना निवेदन देऊन चर्चा झाली असता त्यांनी चालू वर्षाच्या वसुलीतून ही सर्व छोटी देयके व इतर देयके अदा करण्याचे आश्वासन दिले होते. तरी देखील छोटी देयके महापालिकेत थकित असल्याने सदरील देयके मिळण्यासाठी ठेकेदारांनी उपोषण सुरु केले आहे.