अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- कोरोनानंतरच्या संकटानंतर आर्थिक परिस्थिती खालवल्याने महापालिकेत अनेक वर्षापासून थकित असलेल्या छोट्या कामाच्या बीलांची देयके मिळण्यासाठी ठेकेदारांनी महापालिकेसमोर उपोषण सुरु केले होते.
उपोषणाच्या तीसर्या दिवशी बुधवारी त्यांचे आरोग्य खालवले आहे. उपोषणकर्त्यांची आरोग्य परिस्थिती खालवत असल्याने जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांची आरोग्य तपासणी केली.
या उपोषणात एस.बी. भोर, शहानवाज शेख, अमृत नागुल, विजय समलेटी, अमृत वन्नम, जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने प्रकाश पोटे, आकिज सय्यद, सर्फराज सय्यद, संजय डुकरे, नवेद शेख,
समीर शेख, जुनेद शेख, मोहसीन शेख आदी सहभागी झाले आहेत. महानगरपालिकेकडे महापालिकेच्या विविध लेखक शीर्षकांतर्गत शेकडो देयके अनेक वर्षापासून अदा करण्यासाठी प्रलंबित आहेत.
त्या मोठ्या रकमेच्या देयकांची रेग्युलर आणि थकीत अशी दोन ज्येष्ठता याद्या आहेत. यातील देयके ज्येष्ठता यादीनुसार अदा केले जात होते.
तसेच दोन-तीन वर्षापासून नगरसेवक स्वच्छा निधी या लेखाशिर्षका खालील देयके क्रमवारी प्रमाणे वर्षातून सर्व देयके अदा करून संपवली जातात. परंतु 50 हजार पेक्षा कमी रकमेची देयके जेष्ठता यादी केलेली आहे.
परंतु ही छोटी देयके अदा करण्यात आलेली नाहीत. अशी छोटी कामे आपत्तीजनक व अत्यावश्यक परिस्थितीत स्थानिक अडचण निवारण करण्यासाठी करून घेण्यात आलेली आहे.
अशी कामे करणारे ठेकेदार हे साधारण परिस्थितीतले आहेत त्यातच सन २०२० हे कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावात गेले. यामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.
ठेकेदारांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन उरलेले नसल्याने सदर देयके मिळण्यासाठी ठेकेदारांनी सोमवार दि.२५ जानेवारी पासून उपोषण सुरु केले होते. थकित देयके मिळत नाही तो पर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय ठेकेदारांनी घेतला आहे.