कोरोना मृत्यु आकडेवारीवरून काँग्रेसचा प्रशासनावर हल्लाबोल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून दरदिवशी हजाराच्या घरात कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. तसेच कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे, मात्र प्रशासन मृत्यूची खरी आकडेवारी लपवत आहे.

स्वतःची पाठ थोपवून घेण्याच्या नादात नागरिकांना मात्र अंधारात ठेवले जात आहे. असा गंभीर आरोप करीत काँग्रेसचे माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील त्रिंबके आदींनी महापालिका आयुक्तांच्या दालनात आज ठिय्या दिला.

त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनामुळे नगर जिल्ह्यात नेमके किती मृत्यू झाले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन आठवड्यापूर्वी माजी नगरसेवक निखील वारे व पवार यांनी नगरच्या अमरधाम मधून किती करोना बाधितांवर अंत्यसंस्कार केले, याची माहिती घेतली होती.

तेव्हा अमरधाममधून देण्यात आलेली आकडेवारी व प्रशासनाकडील आकडेवारी यामध्ये मोठी तफावत होती. तेव्हापासून सातत्याने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची खरी आकडेवारी द्या, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात येत होती. मात्र, सातत्याने त्याला टाळाटाळ करण्यात

आल्याने अखेर आज महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या दालनात वारे, पवार यांच्यासह ठिय्या आंदोलन करण्यात आले. मृत्यूदर जास्त दाखवला तर सरकारकडून प्रशासनाला विचारणा होईल. मृत्यू का होतात? येथे सुविधा दिल्या जात नाहीत का? असे अनेक प्रश्न निर्माण होतील.

त्यामुळे खरी आकडेवारी झाकून केवळ शाबासकी मिळून घेण्यासाठी मृत्यूदर कमी दाखवला जातोय काय, अशी शंका आहे. प्रशासनातील अधिकारी लोकप्रतिनिधींची दिशाभूल करीत खोटी आकडेवारी देत आहे. अधिकारी खोटी माहिती देतात,’ असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.

या आंदोलनानंतर आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना पत्र देऊन करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी २४ तासाच्या आत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24