अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-जगभर कोरोनाचे संकट कायम आहे. यामुळे यंदाच्या वर्षी अनेक सणउत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. कोरोनाचा धोका पाहता नागरिकांनी देखील या हाकेला साथ दिली होती.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र दत्ताचे शिंगवे येथे दत्तजयंती निमित्त आयोजित करण्यात येणारा यात्रोत्सव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. दत्ताचे शिंगवे येथे मंगळवार व बुधवार दोन दिवस दत्त जयंती निमित्त यात्राेत्सव भरणार होता.
परंतु नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यामुळे यात्रा कमिटीने यावर्षीचा यात्राेेत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे यंदाच्या वर्षी यात्रेच्या दिवशीचा पालखी मिरवणुक सोहळा, सायंकाळचा छबिना व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, कावडी मिरवणूक तसेच दुसऱ्या दिवशीचा कुस्त्यांचा हगामा देखील रद्द करण्यात आला आहे. या ठिकाणी दर्शनासाठी वर्षभर भाविकांची वर्दळ असते परंतू या वर्षीचा यात्रा उत्सव मात्र कोरोनामुळे खंडीत झाला आहे