कोरोनामुळे आता विवाह होईना… पालक चिंतेत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. यामुळे अनेक व्यवसाय व रोजगार बंद झाले; मात्र यामुळे शेकडो विवाह सोहळे पालकांना स्थगित करावे लागले आहेत.

भविष्यातही परिस्थिती कधी पूर्वपदावर येणार, याची खात्री नसल्याने पालकांची चिंता वाढली आहे. जगाची गती थांबविणाऱ्या जीवघेण्या कोरोना या महाभयंकर आजाराचा प्रादुर्भाव चीन, इटली, दक्षिण कोरिया आदी देशांमध्ये वाढत असताना केंद्र व राज्य सरकारने निर्णायक भूमिका घेत लॉकडाऊन जाहीर केले.

सुरुवातीला १४ एप्रिलपर्यंत व पुन्हा ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले. एक महिना झाला सर्व क्षेत्रात शांतता पसरलेली आहे. प्रशासन योग्य नियोजन व चोख बंदोबस्त ठेवत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे; परंतु दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी विवाह सोहळे स्थगित करण्याची वेळ आली आहे.

३ मे नंतरदेखील परिस्थिती आटोक्यात येईल, याची शाश्वती नसल्याने पालकांना चिंता लागली आहे. लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने गर्दी करणे शक्य नाही, त्यामुळे मोजक्या नातेवाईक व कुटुंबाच्या उपस्थितीत विवाह करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करूनदेखील हे शक्य नसल्याने विवाह सोहळे पुढे ढकलण्यापलिकडे पर्याय नाही.

एक साधा सोपा विषय वाटत असला तरी यामध्ये अनेकांच्या रोजीरोटीचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. विवाह म्हटले की, मंगल कार्यालय, बँड, स्वयंपाकी, कपडे, भांडे अशा अनेक बाबींचा समावेश होतो. विवाह स्थगित झाल्याने पालक वर्गाबरोबरच संबंधित व्यावसायिकदेखील काळजीत पडले आहेत.

सध्या सर्वांना फक्त घरी राहून दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे; मात्र परिस्थिती पूर्वपदावर आली तरी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील व एप्रिल महिन्यात असणारे लग्न मुहूर्त मे व जून महिन्यात घेण्यासाठी अनेक जणांची धांदल उडणार आहे. शिवाय मे महिन्यातदेखील काही विवाह तारखा या पूर्वीच निश्चित झालेल्या आहेत.

त्यामुळे तो प्रश्नदेखील राहाणार आहे. कारण ३ मे नंतर लॉकडाऊन शिथील करण्यात आले तरी विवाह सोहळा करण्यास प्रशासन परवानगी देईल, याची हमी नाही.

त्यामुळे पालक व व्यावसायिक यांच्याबरोबरच वधु -वरांच्या काळजीत भर पडली आहे. सध्या फक्त विवाह सोहळा हाच एक प्रश्न नसून अंत्यविधी, दशक्रिया विधी, पान-सुपारी कार्यक्रम, यात्रा-जत्रा, गावातील धार्मिक सप्ताह सोहळा, शाळा, उद्योग, व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे याचाही समाज जीवनावर चांगलाच परिणाम जाणवत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24