अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- जगभर कोरोनाचे संकट कायम आहे. यामुळे यंदाच्या वर्षी अनेक सणउत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते.
कोरोनाचा धोका पाहता नागरिकांनी देखील या हाकेला साथ दिली होती. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथून एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची श्रीदत्त जयंती यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थांनचे मठाधिपती महंत भास्करगिरजी महाराज यांनी दिली.
संस्थांनतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, दर वर्षी श्री क्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रेय जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.
तथापि कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली असतांना सावधगिरीची उपाय योजना म्हणून सरकारने धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनास बंदी घातलेली आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूर व श्रीक्षेत्र आळंदी येथे जारी केलेल्या संचारबंदी आदेशाच्या अनुभवामुळे श्री दत्त मंदिर संस्थान प्रशासनाने यंदाच्या वर्षीचा श्रीदत्त जयंती सोहळा अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार या वर्षी श्री दत्त जयंती निमित्त होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम हे श्रींच्या मंदिरामध्ये स्थानिक सेवेकरी तथा विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत पार पडणार असून नित्याभिषेकही स्थगित ठेवलेले आहेत.
दत्त जयंती सप्ताहा दरम्यान दुरून दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच श्री दत्त जन्मसोहळा सर्वाना पाहता यावा यासाठी मंदिर परिसर तसेच पाकिंग क्षेत्रात ठिकठिकाणी LED SCREEN लावण्यात येतील.
त्याचा सर्वांनी लाभ घेऊन मंदिर परिसरात होणारी गर्दी टाळावी. असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.