अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा देखील वाढत आहे. तसेच कोरोना रिकव्हरी देखील वाढली आहे.
दरम्यान यातच महसूल मंत्र्यांच्या तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कोरोनाचा चढउतार अद्यापही कायम आहे. सुरुवातीच्या काळात सुसाट असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपूवी कमी झाला होता. यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता.
मात्र सावधान तालुक्यात कोरोना पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. दिवाळीनंतर आठवडाभरात तालुक्यात २९३ कोरोना बाधितांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ५ हजारांजवळ येऊन ठेपली आहे. दिवाळीतील गर्दी चांगलीच भोवणार असल्याचे बोलले जात आहे.
परिस्थिती अशीच राहिली, तर बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविली जात आहे. दिवाळीच्या खरेदीवेळी कोरोनाच्या इतर नियमांचे पालनही करणे गरजेचे असताना उल्लंघन होताना दिसले. अनेक दुकानांमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. बाजारपेठ गर्दीने फुलली होती.
मास्क, सॅनिटायझरचा वापर टाळला जात होता. सोमवारी मंदिरे उघडण्यात आल्याने शहरातील अनेक मंदिरात भाविकांनी एकच गर्दी केली. वयोवृद्धांनी मोठ्या संख्येने मंदिरात हजेरी लावली. नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे सोमवार ते शनिवारदरम्यान तालुक्यात २९६ बाधितांची भर पडली.
तालुक्याची बाधित संख्या ४९०४ झाली आहे. ४१ जणांचे बळी गेले आहेत. बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले, तरी वाढत्या रुग्णसंख्येने पालक वर्गात धास्तीचे वातावरण आहे. दरम्यान, प्रशासनाची धावपळ वाढली असून लस उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved