अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : मुलीवर उपचारासाठी पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये गेलेल्या राशीन येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या राशीनमध्ये परत एकदा कोरोनाची एन्ट्री झाली आहे.
या व्यक्तीने राशीनला येण्यापूर्वी श्रीगोंद्यात काही काळ वास्तव्य केल्याने दोन्ही ठिकाणी संपर्कात आलेल्या १७ व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. राशीनमधील या व्यक्तीची मुलगी श्रीगोंद्यात आहे.
ती आजारी होती. तिच्यावर उपचार करण्यासाठी ते पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेथे काही काळ त्यांनी वास्तव्य केले. नंतर श्रीगोंद्याला परत आले. मुलीच्या घरी असतानाच या व्यक्तीला त्रास होऊ लागला.
त्यामुळे तेथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आपल्या मूळ गावी राशीनला आले. तेथे आल्यावर पुन्हा तब्येत बिघडल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे तपासणी केल्यावर त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
तेथे प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने त्यांची करोनाची चाचणी घेण्यात आली असता ती पॉझिटीव्ह आली. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या श्रीगोंद्यातील दहा व राशीनमधील सात जणांची तपासणी करण्यात येत आहे.
राशीनमधील करोनाचा हा आठवा रुग्ण आहे. तर श्रीगोंदा तालुक्यात सध्या एकही रुग्ण नाही. आता मात्र पुन्हा चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
दोन्ही तालुक्यांतील करोनाची साखळी तुटली असे, वाटत असतानाच नवा रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमधूनही चिंता व्यक्त केली जात आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews