अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पहिल्या सोडतीतील प्रवेशप्रक्रियेनंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जात आहे.
कोरोनामुळे आरटीई (शिक्षण हक्क कायदा) प्रवेशाला यंदा मोठा फटका बसला आहे. शाळाच बंद असल्याने आरटीई प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील दोन लाख ९१ हजार ३६३ जागांवर आत्तापर्यंत ३९ हजार १७ प्रवेश निश्चित झाले आहेत. तर, ५१ हजार १०४ पालकांनी आपल्या मुलांचे तात्पुरते प्रवेश घेतले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. मुदत वाढ दिल्यानंतर देखील नगर जिल्ह्यातील सुमारे दीड हजार आरटीईच्या जागा रिक्त आहेत. दरम्यान, आरटीईनूसार पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी देण्यात आली आहे.
प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 8 ऑक्टोबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घेता येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे. शिक्षण विभागाने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रक्रिया जाहीर केल्याने पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसफद्वारे प्रवेशाची तारीख कळविण्यात येणार आहे. परंतु प्रतीक्षा यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता, आरटीई पोर्टलवर विद्यार्थ्यांचा अर्ज क्रमांक टाकून शाळा प्रवेशाची तारीख पहावी, असेही शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी 396 शाळा पात्र असून याठिकाणी 3 हजार 541 प्रवेश क्षमता आहे. प्रवेशासाठीच्या पहिल्या सोडतीमध्ये 2 हजार 335 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला असून 2 हजार 139 विद्यार्थ्यांचे तातपुर्ते प्रवेश झालेले आहेत. यामुळे जवळपास सध्या दीड हजारांच्या जवळपास जागा रिक्त आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved