अहमदनगर बातम्या

कार्पोरेट संस्कृतीमुळे डॉक्टरांवरील हल्ले वाढले, पहा कोणी केला आरोप

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar News :- पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथे डॉ निलेश म्हस्के यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात नगरच नव्हे राज्यातील डॉक्टर एकवटले आहेत.

यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या राज्य संघटनेतील पदाधिकारीही नगरला आले होते. आरोपींना सोमवारपर्यंत अटक करावी, अन्यथा मंगळवारपासून राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र शाखेचे सचिव डॉ. मंगेश पाटे यांनी मोठा आरोप केला आहे.

“अलीकडे वाढलेल्या कार्पोरेट हॉस्पिटल संस्कृतीमुळे डॉक्टर व रुग्ण यांच्यातील संबंध बिघडत आहेत. त्यामुळे डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत,” असा आरोप डॉ. पाटे यांनी केला. डॉ. पाटे म्हणाले, “कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये उपचारांवर आवढव्य खर्च होत असल्याने एकूण सर्वच डॉक्टरांकडे पाहण्याचा रुग्णांचा दृष्टीकोन बदलला आहे.

त्यातून निर्माण झालेला राग आणि गैरसमजातून डॉक्टर आणि हॉस्पिटलवर हल्ले होण्याच्या घटना वाढत आहेत. आरोग्याचा खर्च परवडत नसल्याने तीन टक्के लोक दारिद्रय रेषेखाली जात असल्याचे सरकारी अहवाल सांगतात.

असे असले तरी देशातील ९० टक्के आरोग्य सेवा छोटे हॉस्पिटल गावोगावी देत आहेत. मात्र कार्पोरेट हॉस्पिटलमुळे निर्माण झालेले गैरसमज या सर्वांना भोगावे लागत आहेत.

डॉक्टरांविरूद्ध भडकावून देऊन त्यात स्वत:चा विविध प्रकारे फायदा करून घेणारे घटकही तयार झाले आहेत. या सर्वांचा फटका अगदी गावखेड्यात सेवा देणाऱ्या डॉक्टरांनाही बसत आहे,” असा आरोपही डॉ. पाटे यांनी केला.

यावेळी आयएमएच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. निसार शेख, स्थानिक शाखेचे सचिव डॉ. सचिन वहाडणे, उपाध्यक्ष डॉ. सतीश सोनवणे, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. शितल म्हस्के, डॉ. नरेंद्र वानखडे उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office