मनपा कर्मचाऱ्यांची काही ठिकाणी कृपादृष्टी तर काहींवर वक्रदृष्टी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-  गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नगर जिल्ह्यातील बहुतांश धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तसेच नद्या तलाव देखील तुडुंब भरून वाहिली आहेत.

एवढं सगळं असताना आजही शहरातील अनेक भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. नगर शहराच्या अनेक भागांत सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून होत आहे.

शहरातील स्टेशन रस्ता, बोल्हेगावातील काही परिसर, यासह शहराच्या काही भागांत सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून होत आहेत.

याबाबत अनेकांनी महापालिका प्रशासनाकडे चौकशी केली असता, पाणीपुरवठा मुबलक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अनेक भागांतील पाणी दुसऱ्या भागात सोडून संबंधित कर्मचारी अन्य भागांवर अन्याय करीत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून होत आहेत.

दसरा-दिवाळी जवळ आल्यामुळे शहरासह परिसरातील नागरिकांकडून घरांची साफसफाई सुरू झाली आहे. यामध्ये कपडे धुण्यापासून घरे साफ करण्यासाठी नेहमीच्या तुलनेत पाण्याची जास्त मागणी आहे.

याच संधीचा फायदा घेत काही ठिकाणी जास्त व काही ठिकाणी कमी पाणीपुरवठा केला जात असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या पाणीपुरवठ्याबाबतची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.