कोपरगाव तहसीलमधील शासकीय निधीचा भ्रष्टाचार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नाकाखाली असललेल्या कोपरगाव तालुक्‍यात धक्कादायक घटना उघड झाली असून महसुल विभागात कार्यरत असलेला नियमबाह्य पर्यवेक्षक राहुल साहेबराव शिरसाठ याने मतदान केंद्रस्तगैय अधिकारी यांचे वितरित करण्यात येणारे मानधन परस्पर असंबंधीत नावे दाखवून हडप केले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात राहुल साहेबराव शिरसाठ याचेवर फसवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणांमध्ये तहसीलदार संदीप भोसले यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे पत्र सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिले आहे.

या पत्रामध्ये संजय काळे यांनी म्हटले आहे की, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्‍वास पावरा यांनी दि ३०/०३/२०२४ रोजी समजपत्र देऊन १८/३/२०२४ रोजीच्या फिर्यादीच्या अनुषंगाने १३८/२०२४ प्रमाणे तत्कालीन महसूल सहाय्यक (निवडणूक संकलन ) राहूल साहेबराव शिरसाट यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

मात्र त्या कटातील मुख्य आरोपी तहसीलदार संदीप कुमार भोसले आणि निवडणूक नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी अद्याप मोकळे असून ते पुरावे नष्ट करण्यात मग्न आहेत. या प्रकरणात त्यांचा सहभाग आहे व तेच सुत्रधार असल्याचे निष्पन्न होत असल्यामुळे त्या दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दिनांक ०६/११/२०२३ रोजी माहितीच्या अधिकारात काळे यांनी कोपरगाव तहसिल कार्यालयात २५ केंद्रस्तरीय अधिकारी ज्यांचे खात्यावर प्रत्येकी २४०००/- रुपये प्रमाणे ०६ लाख रुपये जमा झाले त्यांनी निवडणूकीत केलेल्या ‘कामाचा तपशील मागितला असता आज अखेर तहसिल कार्यालयाने ०६/११/२०२३ चे माहिती अधिकारातील अजांची माहिती दिलेली नाही.

जर तहसिलदार हे त्या प्रकरणात सामिल नसते तर दि ०६/११/२०२३ रोजी अफरातफरीचे प्रकरण त्यांचे निदर्शनास येताच त्यांनी पोलीसात तात्काळ फियांद दिली असती पण तसे घडलेले नाही. कारण त्याच दिवशी तात्काळ ०६ लाख रूपये एका चलनाचे द्वारे शासनाच्या तिजोरीत, खात्यावर वर्ग करण्यात आले. असा खुलासा तहसीलदार भोसले यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या तपास अहवालात दिलेला आहे.

तहसिलदार यांनी ते मानधन ज्या २५ लोकाच्या खात्यावर वर्ग होत आहे त्या खातेदारांची नावे किमान नजरेने पहाणे क्रमप्राप्त आहे. तहसिलदार हे कायांलय प्रमुख असल्यामुळे, कार्यालय प्रमुख म्हणून तसेच वित्तीय अधिकारांचा वापर करताना आहरण व संवितरण अधिकारी या नात्याने देयकावर स्वाक्षरी करताना महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम, १९६५ मधील नियमांचे पालन करणे त्यांचेवर बंधनकारक आहे ते त्यांनी पार पाडले नाही. त्या वितरण यादी मध्ये भास्कर पुंजाजी ‘नजन यांना २४०००/- रुपये तीन वेळेस अदा झाले, मनिषा शांताराम कुळधरण यांना दोन वेळेस,

अशोक लहानु भालेराव यांना दोन वेळेस, अर्चना मीननाथ पटारे यांना दोन वेळेस अदा झाले आहे.ही साधी बाब राजपत्रीत अधिकान्याचे नजरेतुन कशी सुटली ? एकाच कुटुंबातील सदस्यांना पैसे कसे वितरीत होतात हे सामान्य ज्ञान अपहार करताना तहसिलदार संदीप भोसले विसरले.

कारण ह्या अपहाराचे मुख्य सुत्रधार तहसिलदार स्वतःच आहेत हे वारंवार सिद्ध होते. असे काळे यांनी म्हटले आहे. निवडणूक नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी व तहसीलदार संदीप भोसले हे पुरावे नष्ट करण्यात गुंतलेले असल्याचे काळे यांनी पत्रात नमूद केले आहे

त्यामुळे त्यांची वर त्वरित गुन्हा दाखल व्हावा अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे तसेच या मानधन वितरणातील बनावट लाभार्थी यांचे बँक खाते राहता तालुक्‍यातील बँकेतील असून कोपरगाव तालुक्‍यातील पीएम किसान च यादीला राहता तालुक्‍यातील शेतकऱ्यांची यादी कशी जोडली जाते ? हा ही एक संशोधनाचा विषय असून यामध्येही काही भ्रष्टाचाराचा वास येतो की काय अशी शंका उपस्थित केली आहे आणि राहुल शिरसाठ याची पत्नी पोलीस सेवेमध्ये असून त्यांचे नाव पी एम किसान च्या यादी त कसे समाविष्ट होते याचाही शोध घेणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे राहुल शिरसाट, मनीषा कुलकर्णी व संदीप कुमार भोसले यांच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा घेऊन त्यांच्या इतर अफरातफरीच्या व भ्रष्टाचाराचे प्रकरणाचा शोध घेऊन दि ०६/११/२०२३ रोजी शासनाच्या तिजोरीत जमा केलेले ०६ लाख रुपये कुणी व कसे जमा केले

याचीही सखोल चौकशी व्हावी व उर्वरित दोन दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे. उच्च न्यायालयात जाण्यापूर्वीची ही नोटीस असल्याचे संजय काळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे त्यामुळे आता हे प्रकरण नेमके कोणत्या वळणावर जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe