अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- नगरयेथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधारी पक्षाने मागील सात-आठ वर्षांत ८० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला आहे.
२०१८ मध्ये सहायक उपनिबंधक एस. डी. सूर्यवंशी यांच्या चौकशी समितीच्या अहवालात या बाबी स्पष्ट नमूद आहेत. त्यानंतरही सत्ताधारी मंडळाचा भ्रष्टाचार सुरूच आहे. याबाबतच्या तक्रारीवरील अहवाल उपनिबंधक गणेश पुरी समितीने तातडीने द्यावा आणि बाजार समितीवर प्रशासक नेमावा,
अशी मागणी नगर तालुका महाविकास आघाडीने गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हराळ, पंचायत समिती उपसभापती रवींद्र भापकर, माजी सभापती रामदास भोर, गोविंद मोकाटे, प्रवीण कोकाटे आदी उपस्थित होते.
२०१८ मध्ये आमच्या तक्रार अर्जावर सहायक उपनिबंधक सूर्यवंशी यांच्या समितीने पहाणी करून अहवाल सादर केला. त्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अनधिकृत गाळे बांधकामाबाबत ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यावेळी भाजपचे सरकार होते व माजी आमदार शिवाजी कर्डिले सत्ताधारी होते.
त्यामुळे त्या सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. महापालिकेच्या परवानगीशिवाय बांधलेले गाळे तातडीने पाडण्याचे आदेश असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. राजरोस भ्रष्टाचार सुरू आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत.
याविषयी आम्ही जिल्हा उपनिबंधक आणि पणन महामंडळाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवर उपनिबंधक पुरी यांच्या समितीची ४ सप्टेंबरला नियुक्ती करत एक महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे, पण बाजार समिती कोविडच्या नावाखाली दप्तर उपलब्ध करत नाही.
पणन कायद्यानुसार उपनिबंधकांनी दप्तर ताब्यात घेऊन चौकशी करत दिलेल्या कालावधीत अहवाल सादर करावा. अन्यथा महाविकास आघाडीचे नेते शेतकऱ्यांसह जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपोषण करतील. वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved