बेसुमार वृक्षतोडीला वनविभागाचे अभय ! अधिकारी फोनच उचलत नाहीत…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परिसरात वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीत बेसुमार वृक्षतोड सुरु असून, याला अभय कोणाचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शनिवारी कासार पिंपळगाव येथे सुमारे ५० वर्षे वयाच्या तीन वृक्षांची कत्तल करण्यात आली असल्याची गंभीर बाब वृक्षमित्र सुकदेव म्हस्के यांच्या नजरेस आली.

एका चारचाकी टेम्पोमधून चार टन लाकडांची वाहतूक करताना हे वाहन अडविले, कारवाईसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला. मात्र, अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने वृक्षपेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सदरील टेम्पोमध्ये भरलेली लाकडे ही मोहोज जवखेडे शिवारांतील एका दुग्धजन्य उपपदार्थ उत्पादन करणाऱ्या खासगी कंपनीचे बॉयलरसाठी जळण म्हणून विकत घेतला जातो. सदर तोडलेली झाडे ही फळझाडे नाहीत, असा जाहीर विसंवाद तेथे रस्त्यावरच झाला. त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली. वृक्षप्रेमींनी येथूनच तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, तोडलेल्या लाकडांना पाच किलोमीटरच्या अंतरातच ग्राहक मिळत असल्याने, लाकूड तोडण्याची मोठी स्पर्धा परिसरात लागली आहे. या खासगी कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात जळावू लाकडांच साठे असूनही वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

सुमारे ५० वर्षे वयाच्या दुर्मिळ झाडांची तोड केली जात असल्याने सध्या तापमान वाढीच्या परिणामास सामोरे जावे लागत असून, निसर्गप्रेमींमधून याबाबत मोठा संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी पाडळी (ता. पाथर्डी) येथे राज्य मार्गावरच अहमदनगर येथील वनविभागाच्या गस्तीपथकाने पकडलेला लाकडाचा टेम्पो तिसगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात लावलेला आहे.

त्या टेम्पोतील लाकडे व लाकूड तोडणाऱ्यांवर काय कारवाई केली, याबाबतची लेखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.एकीकडे पर्यावरण विभाग वाढती उष्णता व पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी वृक्षारोपनाबरोबरच विविध उपाय सुचवत आहे.

पर्यावरण रक्षणासाठी वनविभागाने जनजागृती करणे अपेक्षित असताना वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. एवढेच नव्हे, तर वृक्षप्रेमींनी लाकडाने भरलेला टेम्पो पकडून कारवाईसाठी संपर्क केला तरी वनअधिकारी कोणताही प्रतिसाद देत नाहीत. अनेकवेळा अधिकारी फोनच उचलत नाहीत.

तर वृक्षतोड करणाऱ्यांवरील कारवाईला टाळाटाळ करत असल्याचे जाणवत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अहमदनगर येथील गस्तीपथकाने परीसरात वनपरिक्षेत्र हद्दीत अजूनही मोठ्या प्रमाणात कारवाईसाठी यंत्रणा राबवावी, अशी मागणी वृक्षमित्र सुकदेव म्हस्के व वृक्षप्रेमींकडून केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe