अविश्वास ठराव नामंजूर होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण करणाऱ्या सरपंचाला न्यायालयाचा दणका ; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने अटकेची टांगती तलवार ..!

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन सरपंचाविरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव नामंजूर व्हावा. यासाठी ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण केल्याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे .

याबाबत सरपंच उबाळे यांच्यासह अन्य सात अज्ञात आरोपी विरोधात मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील सरपंच शिवप्रसाद उबाळे आणि उपसरपंच अनुराधा ठवाळ यांच्याविरोधात तेरापैकी दहा ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन अविश्वास ठराव दाखल केला होता.

दहा ग्रामपंचायत सदस्य एकत्र असल्यामुळे अविश्वास ठराव मंजूर होण्याची शक्यता होती. परंतु, नितीन गव्हाणे या ग्रामपंचायत सदस्याचे मंगळवारी (दि. ९) कर्जत तालुक्यातील माहिजळगाव हद्दीतून दोन वाहनांमधून आलेल्या सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी रिव्हॉल्व्हरच्या धाकाने अपहरण केले होते .

याबाबत दीपक राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्यासह अन्य सात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा मिरजगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे .

दरम्यान, ग्रामसभेत तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी आवश्यक संख्याबळाअभावी अविश्वास ठराव नामंजूर केला. तर ग्रामपंचायत सदस्याच्या अपहरण प्रकरणाचा पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी पुढे सखोल तपास करून आरोपी निष्पन्न केले.

अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार अन्य आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. सरपंच उबाळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी श्रीगोंदा येथे जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला.

सुरुवातीला न्यायालयाकडून दोन दिवसांसाठी उबाळे यांना दिलासा मिळाला. रिव्हॉल्व्हरच्या धाकाने अपहरणाचा गंभीर गुन्हा घडला असून यातील अन्य आरोपी, गुन्ह्यात वापरलेली वाहने, शस्त्र जप्त करणे बाकी असल्याचे फिर्यादींच्या वकिलांकडून न्यायालयात मांडण्यात आले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाकडून सरपंच उबाळे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. उबाळे यांच्या बाजूने वकील संकेत ठाणगे तर फिर्यादीकडून सरकारी वकील केदार केसकर, वकील सुनील भोस, सुमित पाटील यांनी काम पाहिले.

या अपहरण प्रकरणातील उबाळे यांच्यासह अन्य सात आरोपींना नगर दक्षिणेतील बड्या नेत्याने आश्रय दिल्याची चर्चा आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office