अहमदनगर बातम्या

वेड्या बहिणीची वेडी माया….. भावासाठी केले चिमुकल्याचे अपहरण ! नगरमधील ‘त्या’ अपहरण नाट्याचा थरारक उलगडा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : लहान किंवा मोठा भाऊ आपल्या लाडक्या बहिणीसाठी काहीही करू शकतो आणि भावनिक बहीण आपल्या भावाला दुःखी पाहण्याची कल्पनाही करू शकत नाही. बहीण आपल्या लाडक्या भावासाठी काहीही बलिदान द्यायला सदैव तयार असते, असे भाऊ-बहिणीचे नाते असते.

अगदी अशीच फिल्मी स्टाईल घटना नगर जिल्ह्यात घडली. भावाला मुलगा होत नसल्याने त्याला मुलगा मिळवून देण्यासाठी बहिणीने चक्क एका ११ महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण केले होते. मात्र पोलिसांनी हा सर्व प्रकार उघड केला.

पारनेर तालुक्यातील सुपा येथे शालन अनिल जाधव, अनिल अशोक जाधव हे दाम्पत्य राहत आहे. शालन अनिल जाधव या महिलेचे माहेर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी हे आहे. नवनाथ विष्णू धोत्रे असे तिच्या भावाचे नाव आहे.

दरम्यान नवनाथ यास आतापर्यंत तीन मुली झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला मुलगा हवा असे त्याला वाटत असे. तसेच आपल्या भावाला एक मुलगा असावा अशी इच्छा त्याची बहीण शालन हिला देखील नेहमी वाटत असे.

मात्र त्यासाठी काय करावे हे समजत नव्हते. मात्र काहीही करून भावाला मुलगा मिळून द्यायचा या एकाच निर्धाराने ती पछाडली होती. तेव्हा तिने भावाला मुलगा मिळून देण्यासाठी या मुलाचा अपहरणाचा डाव आखला. मात्र तो फसला. तो असा ….

१६ जून २०२४ रोजी दुपारी अहमदनगर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील एटीएमजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या एका बालकाची आईशी शालन हिने ओळख वाढविली. त्या पीडित आईजवळील ११ महिन्याच्या बाळाला जेवणाकरिता वरण भात घेऊन येते अशी बतावणी करून बाळास पळवून नेले. ती महिला परत बाळा घेऊन आली नाही.

याबाबत बाळाच्या आईने लोहमार्ग पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. लोहमार्ग पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय लोणकर यांना गोपनीय माहिती मिळाली की वरील गुन्हा सुपा येथील एका दाम्पत्याने केला आहे.

त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी सुपा येथून जाधव दाम्पत्याला ताब्यात घेतले. त्यानंतर अपहरण झालेल्या मुलाबाबत विचारले असता त्यांनी तो मुलगा शालन जाधव हिचा भाऊ नवनाथ धोत्रे याच्याकडे दिला असल्याचे सांगितले.

त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन चव्हाण यांना हि माहिती दिली. त्यांनी तत्काळ पोलिस पथक रवाना केले.लोहमार्ग व संगमनेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत गुंजाळवाडी येथून नवनाथ धोत्रे याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून ११ महिन्याच्या बालकाची सुटका केली. नवनाथ धोत्रे हा शालन जाधव हिचा भाऊ आहे. नवनाथला पहिल्या तीन मुली असून त्याला मुलगा होत नसल्यानेच मुलाच्या हव्यासापोटीच या मुलाचे अपहरण केल्याची कबुली त्यांनी दिली.

 

 

 

Ahmednagarlive24 Office