वाकडीच्या ‘त्या’ घटनेतील मयतांवर अंत्यसंस्कार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : गुढीपाडव्याच्या दिवशी वाकडी (ता. नेवासा) येथील एका विहिरीत सोडलेल्या शेणाच्या स्लरीत अडकून मृत्यू झालेल्या चार मृतदेहावर काल बुधवारी (दि.१०) सकाळी नऊ वाजता वाकडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. तर मजूर बाबासाहेब गायकवाड हे सलाबतपूर येथील रहिवासी असल्याने त्यांच्यावर सलाबतपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता विहिरीत पडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी नगर येथून आलेल्या रेस्क्यू टीमने गळ टाकून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. परंतु त्यातही यश न आल्याने अखेर सेफ्टीटँक साफ करण्यासाठी वापरणाऱ्या व्हॅक्युमपंप असलेल्या गाड्या बोलावून त्याद्वारे विहिरीतील शेण मिश्रित गाळ उपसण्याचे काम सुरू केले.

मृतदेह बाहेर काढण्याचे काम काल बुधवारी रात्री तीन वाजेपर्यंत चालू होते. विहिरीत पडलेल्या विशाल अनिल काळे याचा पहिला मृतदेह मंगळवारी रात्री ९:२५ वाजता बाहेर काढला. त्यानंतर सेफ्टीटँक साफ करण्याची गाडी आणून तिच्या सहाय्याने गाळ उपसण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यात ही यश न आल्याने भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यावरून मोठा हायफ्लोपंप आणून विहिरीतील गाळ उपसण्याचे व उर्वरित ४ मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचे काम काल बुधवारी पहाटे तीन वाजपर्यंत चालू ठेवून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार डॉ. संजय बिरादार, नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल,

पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी हजर राहून मदतकार्य करीत होते. घटना समजल्यापासून विठ्ठलराव लंघे, अंकुश काळे हे घटनास्थळी उपस्थित होते. मदत यंत्रणा सज्ज करण्याकामी त्यांची मोठी मदत झाली.

काल बुधवारी पहाटे मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेले होते. काल बुधवारी सकाळी प्रशासनाने मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, अनिल बापूराव काळे,

विशाल अनिल काळे यांच्या मृतदेहावर वाकडी येथे तर बाबासाहेब गायकवाड हे सलाबतपूर येथील असून मजुरी करण्यासाठी ते वाकडी या गावी होते. त्यांच्यावर सलाबतपूर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी नेवासाचे आमदार शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार पांडुरंग अभंग, विठ्ठलराव लंघे आदी मान्यवरांनी मयतांच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केली.

■सदर मयत झालेल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असून सर्व अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्या परिवारातील कुटुंबाला झालेल्या घटनेमुळे मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पिडित कुटुंबाला तसेच मजूर असलेल्या बाबासाहेब गायकवाड यांच्या परिवाराला शासनाची तातडीची मदत मिळावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे सोमनाथ कचरे यांनी केली आहे.