अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- पती, दीर, सासू व सासऱ्याने केलेल्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेने (दि.१५ डिसेंबर रोज़ी) धनगरगल्ली (शेवगाव) येथे आत्महत्या केली.
याप्रकरणी विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत विवाहितेचे वडील बाळासाहेब रघुनाथ भावले (रा.करंजी, ता. पाथर्डी) यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी मयत विवाहितेचा पती राहुल विश्वास गाडे, दीर – सूरज विश्वास गाडे, सासरा – विश्वास गोधाजी गाडे व सासू सुनीता विश्वास गाडे (सर्व रा.प्रभाकरनगर, शेवगाव) या चोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, मुलीचे लग्न राहुल गाडे याच्याबरोबर (दि.३० जून २०२० रोजी) झाले. तेव्हापासून मुलगी स्वाती हिच्या लग्नात संसारोपयोगी साहित्य दिले नाही म्हणून पती, दीर, सासू, सासरे हे माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी वेळोवेळी मुलीस शिवीगाळ व दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ करीत होते.
दीर सूरज याने स्वाती हिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.