अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव शहरात अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गाई घोळक्याने बसलेल्या आढळतात. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असते.
अनेकदा गायीची झुंज झाल्याने अपघातही घडतात, यामुळे अशा प्राण्यांना जप्त करण्यात येणार असून संबंधित पशुपालकांवर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिला आहे. याबाबत पुढे बोलताना वहाडणे म्हणाले,
नगरपरिषदेने अनेकदा शहरात भटकणार्या गायींना पकडून कोकमठाण येथील गोशाळेत व कुंभारी येथे उंडे महाराजांच्या गो शाळेतही ठेवल्या.
तरी आजही शहरात अनेक गाई फिरताना दिसतातच. गायीचे दूध काढून घ्यायचे व नंतर त्याच गायीला कचरा, प्लास्टिक खायला शहरात मोकाट सोडून देण्याचा बेजबाबदारपणा योग्य नाही.
शहरातील मोकाट डुकरांच्या मालकांनीही डुकरांचा बंदोबस्त करावा. त्यामुळे अपघात होतात. अनेकांना डुकरे चावा घेतात. आता डुकरांच्या मालकांवर गुन्हे तर दाखल होतीलच.
पण परराज्यातील ठेकेदार बोलावून सर्व भटकी डुकरे जप्त करून नेली जातील हे लक्षात घ्यावे. गायी-डुकरे जप्त केल्यास तथाकथित समाजसेवकांनी व प्राणीमित्रांनी त्यांच्या मालकांची वकिली करण्यास नगरपरिषदेत येऊ नये हीच विनंती.
कारण नगरपरिषद निवडणूक जवळ आल्याने अनेक नवे उत्साही समाजसेवक प्रसिद्धीची संधीच शोधताना दिसत आहेत, असेही वहाडणे म्हणाले.