अहमदनगर बातम्या

अहमदनगरमधील कचरा संकलन करणार्‍याविरूध्द गुन्हा; दीड कोटींची फसवणूक

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शहरातील कचरा संकलन करणार्‍या स्वयंभु ट्रान्सपोर्टचे संचालक/चालक नामदेव भापकर (रा. खडकी, पुणे) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात भांदवि कलम 420, 467, 468 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.P

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश तुकाराम जाधव (रा. बागरोजा हाडको, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. महानगरपालिकेची सुमारे एक कोटी 42 लाख 63 हजार 138 रूपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

भापकर यांच्या स्वयंभु ट्रान्सपोर्टने अहमदनगर शहरातील कचरा संकलन करत असताना नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान कॉन्ट्रॅक्टमध्ये देण्यात आलेल्या अटी व शर्तीची पुर्तता न करता बनावट बिले तयार केली.

ते बिले अहमदनगर महापालिकेला सादर करून एक कोटी 42 लाख 63 हजार 138 रूपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी भापकर यांच्याविरूध्द भांदवि कलम 420, 467, 468 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर करीत आहेत.

करोना काळात केलेल्या कचरा संकलनाची वाढीव बिले स्वयंभु ट्रान्सपोर्टने दिल्याची तक्रार जाधव यांनी महापालिकेकडे केली होती. महापालिकेने यासंदर्भात कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.

स्वयंभु ट्रान्सपोर्टने बिले सादर करताना दुचाकी वाहनांचे नंबर असलेल्या गाड्यांची बिले दिलेली होती, असा दावा जाधव यांनी केला होता. स्वयंभु ट्रान्सपोर्टने खोटी बिले सादर करून महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी जाधव यांनी केली होती.

या याचिकेवर प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी निकाल देत स्वयंभु ट्रान्सपोर्टविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर मंगळवारी हा गुन्हा दाखल झाला आहे.

Ahmednagarlive24 Office