महायुती सरकारने सुरु केलेल्या महत्वकांक्षी एक रुपयात पीक विमा योजनेतून राहाता तालुक्यातील ४६ हजार ८२२ शेतकऱ्यांना १६० कोटी रुपयांचा पीक विमा मंजुर झाला असून, यापैकी ४०.८५ कोटी रुपये अग्रीम रक्कमेच्या माध्यमातून यापुर्वीच शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना पुर्णपणे मिळावी यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व आर्थिक उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरु केली.
याच धर्तीवर राज्य सरकारने खरीप हंगाम २०२३ पासून एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली. या योजनेत राहाता तालुक्यातील ४६ हजार ८२२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.
मंध्यतरी झालेला अवकाळी पाऊस व इतर नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून २५ टक्के अग्रीम रक्कमेपोटी शेतकऱ्यांना ४०.८५ कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते.
यामध्ये सोयाबीन आणि मका या पीक उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश होता. मंत्री विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, पीक कापणी प्रयोग आधारित एकुण १६०.१० कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजुर झालेली आहे.
राहाता तालुक् यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असून, विमा कंपनी व राज्य शासना मार्फत विमा रक्कमेचा उर्वरित निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे.
यावर्षीही राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुरु केली असून, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, म्हणून या योजनेत सहभगी होण्याचा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.