Ahmednagar News : यंदा जून महिन्यातच मान्सूनच्या पावसाने राज्यात दमदार हजेरी लावली. यात नगर जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पाडला. मात्र जिल्ह्याच्या उत्तरेत अद्याप देखील पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागात काही ठिकणी पेरण्या केल्या तर काही भागात पेरण्या बाकी आहेत. विशेष म्हणजे सर्व धरणे एकच भागात असल्याने पावसाअभावी धरणांनी तळ गाठला असून, आज मितीला धरणात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
जून महिन्यात सरासरी १०८.२ मिलीमीटर पावसाची नोंद होते. मात्र यंदा ही सरासरी ओलांडून तब्बल १७७.३ मिलीमीटर पाऊस पडला असला तरी अजूनही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. जूलैच्या या दोन दिवसांत २१.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सध्या गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण दिसत असले तरी काही भागात रिमझिम पाऊस पडत आहे. मात्र जोरदार पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ७४ टक्के खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी झाली आहे. अजून काही भागात पेरणी सुरूच आहे. यात सर्वाधिक कापसाची लागवड १ लाख ९ हजार ४२९ हेक्टर क्षेत्रावर झाली असून त्याखालोखाल सोयाबीनची पेरणी ८८ हजार ८८९ हेक्टरवर झाली आहे.
जून महिन्यात मूग नक्षत्राचा पाऊस वेळेवर झाल्याने विशेषतः नगर दक्षिणमध्ये पेरण्या वेळेवर झाल्या. मात्र उत्तर नगर जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह अकोले, श्रीरामपूर, संगमनेर व राहाता या चार तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने या ठिकाणी पेरण्यांना विलंब झाला.
मात्र आता सर्वच तालुक्यात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यात २ जूलैला सर्वत्र पावसाने हजेरी लावली.
काही ठिकाणी जोरदार पाऊस तर भागात रिमझिम पाऊस झाला आहे. हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.
यंदा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ लाख ७४ हजार ४६१ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ४ लाख २८ हजार ९६४ हेक्टर क्षेत्रात खरीपाच्या विविध पिकांची पेरणी झाली आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये अजूनही पेरणी सुरू आहे.
अशी केली आहे पेरणी बाजरीः ५७ हजार ४०, मूग ३२ हजार ९६०, तूर- ५० हजार ३७१, उडीदः ४७ हजार ३७७, मकाः ३८ हजार ९१२, भुईमूगः १ हजार ५३१, तीळः ३०, सुर्यफुलः ६८. भातः अकोले तालुक्यात भाताचे मोठे क्षेत्र आहे. सध्या तालुक्यात रोपवाटीका प्रक्षेत्रावर १०२० हेक्टर क्षेत्रावर भाप रोपे तयार करण्यात आलेली आहेत. तर १ हजार ५१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.