दलित, मागासवर्गीय समाजाकडे फक्त वोट बँक म्हणून पाहिले जाते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- दलित, मागासवर्गीय समाजाचे आजही अनेक प्रश्‍न ज्वलंत आहे. या समाजाकडे सत्ताधारी व विरोधक फक्त वोट बँक म्हणून पाहतात. या समाजाला लोकसंखेच्या प्रमाणात राज्यकर्त्यांनी प्रतिनिधित्व दिले नाही व न्यायही मिळवून दिलेला नाही.

समाजाला संघटित होऊन आपला न्याय संघर्षातून मिळवावा लागणार आहे. समाजातील प्रश्‍न शासनस्तरावर सोडविण्यासाठी भारतीय वाल्मिक संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे प्रतिपादन तालेवर गोहेर यांनी केले. भिंगार येथील संभाजीनगरला भारतीय वाल्मिक संघटनेची स्थापना करुन संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोहेर बोलत होते. याप्रसंगी अ.भा. मेहेतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, जिल्हा सचिव राहुल लखन, आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, ग्रामपंचायत सदस्य देवराज भालसिंग, सुरज जंगारे, जितू वाल्मिकी, विशाल गोहेर,

आनंद गोहेर, प्रवीण घावरी, दिगंबर सिंग, संदीप थोरात, रवी खरारे, गोपाळ गोहेर, सनी भिंगारदिवे, आकाश चव्हाण, रवी गोहेर, राहुल गोहेर आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अ.भा. मेहेतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे यांनी समाजातील युवकांनी संघटित होऊन पुढे आल्यास अनेक प्रश्‍न सुटणार आहे. या समाजाला कोणाच्या सहानुभूतीची गरज नसून, हक्क मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष असल्याचे सांगितले. तसेच समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दलित, मागासवर्गीय समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटना पुढाकार घेणार असून, समाजावर होणार्‍या अन्याय, अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी संघटनेचे कार्य सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24