Ahmednagar News : प्रवरा नदीवरील बंधाऱ्यासाठी चालू आवर्तनातून पाणी आरक्षित असतानाही हेडचे बंधारे भरले; मात्र नेवाशातले तीन शासकीय बंधारे अद्याप भरून दिले नसल्याने पाचेगाव, पुनतगाव, चिंचबन, खुपटी,
नेवासा बु. व नेवासा आदी गावांतील लाभधारकांमध्ये निर्माण झालेला असंतोष विचारात घेऊन नेवासा तालुक्यातले तीनही टेलचे बंधारे भरून द्यावे, अशी मागणी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केली आहे.
याबाबत पत्रकात म्हटले, की भंडारदरा, मुळा व गोदावरी प्रकल्पाची उन्हाळ हंगाम सन २०२३-२४ ची कालवा सल्लागार समितीची बैठक ११ मार्च २०२४ रोजी झाली होती. त्यात प्रवरा नदीवर असलेले १४ शासकीय बंधारे भरून देण्यासाठी एक टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले होते. त्यानुसार हेडचे बंधारे भरून देण्यात आले असून नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव, मधमेश्वर हे तीन बंधारे अद्याप भरून दिले नसल्याने लाभधारकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. लाभधारक गावातील कार्यकर्त्यांनी आमदार गडाख यांची भेट घेऊन हे बंधारे त्वरित भरून देण्याची मागणी केली आहे.
कडक उन्हाळ्यामुळे विहिरी व बोरची पाण्याची पातळी खालावली आहे. आजूबाजूच्या गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. बंधाऱ्याच्या परिसरातील जवळपास आठ ते दहा गावे प्रवरा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून असतात.
बंधाऱ्यात पाणी नसले तर या लाभधारक गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजनावरही विपरीत परिणाम होतो. एकतर टेलचे बंधारे अगोदर भरून देणे आवश्यक होते. हेडचे बंधारे भरले; मात्र नेवासे तालुक्यातील बंधारे भरले नाहीत, त्यामुळे तेथील लोक आंदोलनाच्या पाविर्त्यात असून त्यांनी आमदार गडाख यांना हे बंधारे भरून देण्यासाठी साकडे घातले आहे.
लोकभावना व तिथली निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेऊन आमदार गडाख यांनी आरक्षित असलेल्या पाण्यामधून टेलचे बंधारे त्वरित भरून द्यावेत, अशी संबंधीताकडे मागणी केली असून हे बंधारे भरून दिले नाहीत तर लाभधारक गावांमधील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.