अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरातील ओढे व नाल्यांवर अतिक्रमण वाढल्यामुळे जलस्फोटाच्या शक्यतेकडे प्रा. शशिकांत चंगेडे यांनी दीड महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.
मनपा स्तरावर ओढे नाल्यांवरील अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा फटका अतिवृष्टीमुळे सामान्य नागरिकांना बसला आहे. नगर शहरात पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असताना, चंगेडे यांचे ते पत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
पत्रात म्हटले आहे की, सिना नदीला नगर शहरात २१ ओढे होते, त्यापैकी १७ ओढे नागरिकरणात अरुंद झाले आहेत. सावेडी उपनगरातून वाहणारे काही प्रमुख ओढे बुजवले असल्याचे चेंगेडे यांचे म्हणणे आहे.
शहरातील तारकपूर डेपोजवळील एक ओढा बुजवलेला असून त्यावर अतिक्रमण झाले आहे. तथापि, मनपाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आता पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरण्याचा धोका असून याला मनपाच जबाबदार आहे.
अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे सावेडी उपनगर जलस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. शहरातील सुमारे १५ हजार कुटुंबांना हा धोका आहे.
त्यामुळे सीना नदीपात्रातील अतिक्रमणे काढून नदीपात्र स्वच्छ करावे, या मागण्या आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असल्याने मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून हानी टाळावी, असे चेंगडे यांनी पत्रात म्हटले आहे.
चेंगेडे यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी, आयुक्तांचे प्रश्नाकडे लक्ष वेधूनही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसांत अनेक घरात पाणी शिरले. आता आयुक्त शंकर गोरे ओढ्या-नाल्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.