Ahmednagar News : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेला गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे-भोजडे मार्गावर असलेल्या नाईकवाडी वस्ती मंगळवारी (दि. ९) रात्री घडली. विलास जाधव (रा. चांदगाव, ता. वैजापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे, तर नवनाथ सोनवणे गंभीर जखमी झाला आहे.
घटनेबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे मंडपाच्या कामासाठी वैजापूर तालुक्यातील चांदगाव, नांदगाव येथून विलास जाधव व नवनाथ सोनवणे आले होते.
काम आटोपून दोघे आपल्याला मोटरसायकलवरून घरी निघालेले असताना भोजडे-धोत्रे दरम्यान नाईकवाडे वस्तीजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील बाजूस धडकले. यात विलास जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
तर नवनाथ सोनवणे हे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकेतून जखमीस कोकमठाण येथील एसजेएस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, विलास जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला.
नियम न पाळल्याने होतात अपघात
सध्या साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरु आहे. बहुतेक वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साह्याने होते. हे ऊस वाहतूक वाहतूकीचे नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे अपघात मोठ्या प्रमणात होत असतात.