अहमदनगर बातम्या

शहरात लावलेल्या स्मार्ट एलईडी दिव्यांखाली अंधारच!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर शहरात तब्बल २५ हजार स्मार्ट एलईडी दिवे बसविण्याचा ठेका दिला, मात्र अजूनही शहरात सर्वत्र लाईट बसल्या गेल्या नाहीत.

यासंदर्भात स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी संबंधित ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र या बैठकीला आयुक्त उपस्थित नसल्याने पुन्हा एकदा बैठक आयोजित केली जाईल.

त्यात तांत्रिक बदल करून ठेकेदाराला जास्त वॅटचे दिवे लावण्याची सूचना केली जाईल असे सांगत सभापती घुले यांनी शहराच्या भल्यासाठी चांगले निर्णय घेतले जातील असे सांगितले.

यावेळी संबंधित ठेकेदार एजन्सीच्या प्रतिनिधींनी बैठकीत दिलेल्या माहितीचे समाधान न झाल्याने पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले.

एलईडी ठेका घेण्यापूर्वी दिलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये ६० वॅटचे दिवे लावून दाखविले. त्याचा लख्ख प्रकाश पडल्याने ठेका दिला. प्रत्यक्षात मात्र ३० वॅटचे दिवे लावले जात आहेत.

ही नगरकरांची फसवणूक असून यासंदर्भात महासभा घ्यावी. त्यात निर्णय घ्यावा, अशी सूचना केली. तसेच सरसकट ६० वॅटचे दिवे लावावेत.

जुने काढलेले चालू फिटिंग ज्या ठिकाणी बंद आहेत, तेथे तात्पुरत्या स्वरूपात लावण्यात याव्यात, अशी सूचना केली. शहरात पथदिवे बंद असल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत, तात्काळ एलईडी बसवण्याच्या सूचना केल्या.

Ahmednagarlive24 Office