अहमदनगर बातम्या

श्रीक्षेत्र देवगडचा दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- अग्रभागी भक्तिगीते गाणारे बँड पथक, सनई चौघडा वादक, त्यामागे भगवी पताका खांद्यावर घेत ‘दिगंबरा दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा…’ असा जयघोष करत नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे दत्तजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.(Shri Kshetra Devgad) 

नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्ताने हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंदिर प्रगणात आकर्षक फुलांनी सजवलेल्या मंडपात दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात आला.

या प्रसंगी भजन, आरती, पूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. श्री दत्त जन्मोत्सव सोहळयाच्या प्रसंगी पहाटे भास्करगिरी महाराजांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात येऊन अभिषेक घालण्यात आला.

करोनाची व नवीन आलेल्या ओमिक्रॉनची महामारी लवकरात लवकर जाऊ द्या, सारे विश्व सुखी होऊ द्या, अशी प्रार्थना यावेळी महंत भास्करगिरी महाराज यांनी भगवान दत्तात्रयांना केली.

पहाटेपासून देवगडकडे येणारे रस्ते सुरू होते. पहाटेपासून भाविकांचा दर्शनासाठी ओघ सुरू होता. त्यामुळे प्रवरासंगम, देवगडफाटा,

नेवासा येथून देवगडकडे जाणार्‍या रस्त्यांवर ठिकाणी नेवाशाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Ahmednagarlive24 Office