भरदिवसा बिबट्याचे दर्शन ! दहशतीमुळे भितीचे वातावरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील बेलापूर परिसरात बिबट्याचा धूमाकूळ सुरू आहे. अनेकांना भरदिवसा बिबट्याचे दर्शन घडत आहे. बिबट्यांनी परिसरातील पाळीव कुत्रे, मोर यावर ताव मारला आहे.

बिबट्यांच्या मुक्त संचाराने बेलापूर शिवारातील वाड्या-वस्त्यांवर दहशत व भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच वनविभागाच्या दुर्लक्षाबद्दल चीड व्यक्त होत आहे.

बेलापूर शिवारातील गोखलेवाडी, कुन्हे वस्ती, दिघी रोड व टिळकनगर परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेकांना बिबट्याचे दर्शन घडले आहे. या बिबट्याने वस्त्यावरील पाळीव कुत्रे, शेळ्या तसेच मोर फस्त केले आहेत. एका ठिकाणी तर चक्क नारळाच्या झाडावरील मोरावर बिबट्याने हल्ला केला

बिबट्याच्या या प्रकारामुळे बेलापूर शिवारातील वाड्या-वस्त्यांवर दहशत पसरली आहे. रात्ररात्र जागून थाळ्या वाजविणे, फटाके फोडणे, असे प्रकार करावे लागत आहेत. या परिसरातील अनेक मुले, मुली सायकलवर अथवा पायी शाळेला जातात. त्यांच्याबाबत पालकांत चिंतेचे वातावरण आहे. या मुलांना जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागते.

या संदर्भात वनविभागाकडून काहीही कारवाई केली जात नाही. वनविभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील नागरीक संताप व्यक्त करीत आहेत. वनविभागाने तातडीने याप्रश्नी लक्ष द्यावे आणि बिबट्याच्या दहशतीतून नागरीकांना मुक्त करावे, अशी मागणी केली जात आहे.