अहमदनगर बातम्या

लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात सकाळीच जमा झालेत ‘इतके’ रुपये ! फटाफट करा चेक

Published by
Ahmednagarlive24 Office

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत ८० लाखांपेक्षा अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात पहिल्या हप्त्याची प्रत्येकी तीन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत १ कोटी ६२ लाखांपेक्षा अधिक महिलांनी नोंदणी केल्याचेही तटकरेंनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी राज्यातील महायुती सरकारने पावसाळी अधिवेशनात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना जाहीर केली होती.

अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी राज्य सरकारने २५ हजार कोटींची तरतूद केली आहे. सध्या महिलांची नोंदणी सुरू आहे. आजवर १ कोटी ६२ लाख महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.

राज्यात साधारणपणे दोन ते अडीच कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे ३ हजार रुपये जमा करण्यासंदर्भात मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या पात्र महिलांना बुधवार, १४ ऑगस्टपासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

बुधवारी ३३ लाख महिलांच्या खात्यात ९९९ कोटी रुपये जमा केले आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्यातील ८० लाख महिलांच्या बँक खात्यात २ महिन्यांच्या लाभाचे प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

उर्वरित पात्र महिलांच्या बँक खात्यात १७ ऑगस्टपर्यंत पैसे जमा होतील. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

आणि महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office