Ahmednagar News : अकोले तालुक्यातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यातील हरिश्चंद्रगड शिखर परिसरातील धोकादायक ‘कोकण कड्यावरून खोल दरीत पडून घाटकोपर (मुंबई) येथील २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.
रविवारी (७ एप्रिल) दुपारी ही घटना घडली. अवनी मावजी भानुशाली (वय २२, रा. घाटकोपर, पश्चिम मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे.
घाटकोपर येथील अवनी भानुशाली ही रविवारी हरिश्चंद्रगडावर पर्यटनासाठी आली होती. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ती धोकादायक कोकण कडा परिसरात फिरत असताना, अचानक खोल दरीत पडून तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, कोकण कड्यावरून तोल जाऊन दरीत पडल्याने तिचा मृत्यू झाला, की कोकण कड्यावरून उडी मारून तिने आत्महत्या केली, याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. स्थानिक नागरिक व वन कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती वनाधिकारी व राजूर पोलिसांनी दिली.
त्यानंतर राजूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे, पोहेकॉ व्ही. के. मुंढे यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून खोल दरीतून युवतीचा मृतदेह बाहेर काढला. राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी राजूर गाठले. तरुणीचे वडील मावजी जेठालाल भानुशाली (वय ५२) यांनी राजूर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी अवनी मावजी भानुशाली ही काहीतरी तणावातून हरिश्चंद्रगडावर आली होती.
कोकण कड्यावरून दरीत उडी मारून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला.