Ahmednagar News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे स्पष्ट केले आहे. वाकचौरे हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून विजयी होतील, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारीही उपस्थित होते.
यामुळे शिर्डीतील उमेदवारीचा सस्पेन्स आता उठला असून, वाकचौरे यांच्या उमेदवारीची मुंबईतून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. शिर्डीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुरुवारी विनायक राऊत यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना ही माहिती दिली.
यावेळी भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, सचिन बडधे, लखन भगत, संजय छल्लारे, राधाकिसन बोरकर, निखिल पवार, शेखर दुबय्या, राष्ट्रवादीचे संदीप वर्षे उपस्थित होते. काँग्रेसचे काही नेतेही या बैठकीला उपस्थित होते.
महाआघाडीच्या उमेदवारी वाटपात शिर्डीच्या जागेबाबत अनेक दिवस घोळ सुरू होता. शिर्डीची जागा काँग्रेसला सोडून त्याबदल्यात शहरी मतदारसंघ सेनेला देण्याची चर्चा सुरू होती.
मात्र, वाकचौरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासूनच प्रचाराला सुरवात केली होती. खासदार राऊत हे शिवसेनेचे सचिव असून, ते वरिष्ठ नेते आहेत. आता त्यांनीच महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वाकचौरे यांची उमेदवारी जाहीर करीत सर्व शक्यता संपुष्टात आणल्या आहेत.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच लोक विजयी करतील. भाऊसाहेब वाकचौरे यांची जनमाणसांतील प्रतिमा आणि संपर्क या बळावर ते महाआघाडीचे उमेदवार म्हणून पसंतीस उतरतील.
भाजपने पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले आहे. लोकांना मात्र श्रद्धा आणि निष्ठा हवी असते.महाआघाडीच्या त्रिवेणी संगमातून आघाडीचे खासदार म्हणून वाकचौरे विजयी होतील, असे राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेत पंतप्रधानपदाचे दावेदार नाही
पंतप्रधानपदासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी,राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार हे दावेदार आहेत. शिवसेनेमध्ये मात्र कोणीही पंतप्रधानपदाचे दावेदार नाहीत. केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता येऊन शिवसेनेला मंत्रिपदे मिळतील.
त्याचा आम्हाला निश्चितच अभिमान राहील; मात्र मुजोर लोकांना धडा शिकवणार, असे राऊत यावेळी म्हणाले. त्यांचा रोख भाजपकडे होता. डॉ. आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान संपविण्याचे कटकारस्थान करणाऱ्यांना लोक मातीत गाडतील, असा इशारा त्यांनी दिला.