अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- महापालिकेने तीन आठवड्यापूर्वी निवड केलेल्या पाच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी बेकायदेशीर असल्याचा दावा येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केला असून, यासंदर्भात त्यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे.
या निवडी रद्द करण्यासह कायद्याचे उल्लंघन झाल्याने महापौरांना अपात्र ठरवावे व मनपा आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी यात केली आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर स्वीकृत सदस्य निवडीसाठी नगर सचिव कार्यालयाने २३ जानेवारी २०१९ रोजी प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावानुसार महापाैरांनी विशेष सभा बोलावून स्वीकृत सदस्य निवड करणे आवश्यक होते, परंतु त्यांनी प्रस्ताव प्रलंबित ठेवला होता. त्यानंतर पुन्हा फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये नगर सचिव विभागाने फेरप्रस्ताव दिला.
त्यानुसार झालेल्या १० जानेवारी २०२० रोजीच्या सभेत तत्कालीन जिल्हाधिकारी तथा आयुक्त राहूल द्विवेदी यांनी पक्षाच्या गटनेत्यांनी सूचवलेली नावे फेटाळत ती अपात्र असल्याची शिफारस केली होती. त्यामुळे या निवडी पुन्हा लांबणीवर पडल्या. १ आॅक्टोबरला महापाैर वाकळे यांनी स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभा बोलावली.
या सभेत राष्ट्रवादीकडून विपूल शेटिया, राजेश कातोरे, शिवसेनेकडून मदन आढाव, संग्राम शेळके, तर भाजपकडून रामदास आंधळे यांची नावे सूचवली गेली. या नावांना महापाैर वाकळे यांनी आॅनलाईन सभेत मान्यता दिली. सचिवांना पाठवलेल्या पत्रात,
शेख यांनी स्वीकृत सदस्य निवडीचा १ आॅक्टोबरचा ठराव क्रमांक ३ विखंडित करून निवड झालेल्या सदस्यांना अपात्र ठरवावे, आयुक्तांनी ठराव विखंडित करण्यासाठी शासनाने शिफारस करण्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी,नगरसचिवांकडून स्वीकृत सदस्य निवडीसाठी २३ जानेवारी २०१९ रोजी प्रस्ताव पाठवेला असताना
महापाैर वाकळे यांनी सभा बोलावण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी त्यांना सदस्य पदावरून अपात्र ठरवावे, तसेच कायद्यातील तरतुदीनुसार सदस्यांची निवड करण्याबाबत विशेष सभा आयोजित करून शासनाने आयुक्तांना आदेश द्यावेत, अशीही मागणी शेख यांनी केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved