अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-नगर तालुका, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत वाढलेले अवैध धंद्यांवर कारवाई करुन त्वरीत बंद करण्याच्या मागणीचे निवेदन दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, निलेश चांदणे, रफिक शेख, विशाल भालेराव आदी उपस्थित होते. नगर तालुका, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे. दारू, मटका, जुगार, अमली पदार्थ, गांजा विक्री सर्रासपणे चालू आहे.
टाळेबंदीच्या काळात देखील पोलीसांच्या वरदहस्ताने सर्व व्यवसाय चालू होते. टाळेबंदीत युवकांच्या हाताला काम नसल्याने अनेक युवक नशेच्या आहारी गेले. घरातील सामान व महिलांचे दागिने विकून अनेक युवक व पुरुष नशा करीत आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तर महाविद्यालयीन युवक देखील नशेच्या आहारी जात आहे.
व्यसनामुळे अनेक युवक गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहे. मुलींची छेडछाड, मंगलसूत्र चोरी, पैश्यासाठी चोरी-मारी व लूटचे प्रकार घडत असून, परप्रांतीय ट्रक चालकांना लुटण्याचे प्रकार चालू आहे. अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीवृत्ती वाढत असून, सदर प्रकार हा पोलिसांच्या वरदहस्ताने चालू आहे.
अवैध धंदे, मारहाण व लुटीच्या प्रकारातील आरोपींना पोलीस पाठिशी घालत असून, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप दलित महासंघाच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात कोणी तक्रार दिल्यास पोलीसच अवैध धंदेवाल्यांना तक्रारदारांचे नांव सांगतात. तक्रारदाराला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तर वेळप्रसंगी मारही खावा लागत आहे. यामुळे त्यांची तक्रार करण्यास देखील कोणी पुढे येत नाही. अवैध धंदेवाली व पोलीसांचे आर्थिक हितसंबध असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसून, गुन्हेगारांना कायद्याची भिती राहिली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या भागातील सर्वसामान्य नागरिक अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रस्त असून, नगर तालुका, एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत वाढलेले अवैध धंद्यांवर कारवाई करुन त्वरीत बंद करण्याच्या मागणी दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved