Ahmednagar City News : कायनेटिक चौकात नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar City News : गेल्या ४ वर्षापासून पुणे रोड कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाण पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी खा. सुजय विखे यांच्याकडे नगरसेवक मनोज कोतकर हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन सुधारित रेल्वे स्टेशन उद्घाटन प्रसंगी खा. सुजय विखे पाटील यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले.

यावेळी खा विखे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, हा पूल खूप जुना झाला आहे. पुलाची दुरावस्था झाली असून या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. त्याचे कठडे तुटलेले आहेत. तसेच हा पुल अरुंद असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होवून अपघात होत आहेत.

या पुलावर वारंवार अपघात होत आहेत, त्यातच या पुलावरून एक डंपर जात असताना थेट या पुलाखाली पडून अपघात झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या पुलाच्या आजूबाजूला प्रियांका कॉलनी परिसरात मोठी नागरी वसाहत असून, त्यांना देखील या पुलापासून धोकाच आहे.

केडगाव येथील रेणुका मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून नवरात्र उत्सवादरम्यान भाविक याच पुलावरून देवी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. नगर शहरात झालेला नविन उड्डाण पुल तसेच दौंड रोडचा हायवे देखील कायनेटीक चौकात येतो.

त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक कायनेटीक चौकामध्ये उड्डाण पुलावरील आणि उड्डाण पुलाखालील वाहने एकाच वेळी एकत्र येवून येथे मोठी वाहतुक कोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या रांगा लांबपर्यंत लागतात. त्यामुळे कायनेटीक चौक तसेच केडगाव परिसरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे.

याकरिता सदरील रेल्वे उड्डाण पुल नविन बांधून त्याची लांबी कायनेटीक चौकाच्या पुढे नेणे आवश्यक आहे. नविन उड्डाण पुलामुळे या परिसरातील वाहतुक खालून जाण्यास मदत होईल व औरंगाबाद पुणे जाणाऱ्यांना उड्डाण पुलावरून जाता येईल. आणि यातून वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यास मदत होईल.

तरी या उड्डाण पुलावर मोठी दुर्घटना होण्याआधीच लक्ष देणे महत्वाचे आहे, या सर्व बाबींचा विचार करून जुना रेल्वे उड्डाण पुल पाडून त्याच ठिकाणी कोठी रस्त्यावरील उड्डाणपुलासारखा नविन रेल्वे उड्डाण पुल कायनेटीक चौकापुढे पर्यंत करण्याच्या दृष्टिने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी खासदार सुजय विखे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.