पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- मागील दीड वर्षापासून पारनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वाद ग्रस्त ठरलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्याची मागणी समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दोन महिन्यात लाभार्थींना लाभ न मिळाल्यास त्यांच्यासह नाशिक विभागीय आयुक्त कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांनी जाणीपूर्वक संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या विधवा महिला, दिव्यांग, परितक्ता यांची प्रकरणे गेली दीड वर्षापासून प्रलंबित ठेवली आहे.

सदरच्या प्रकरणाबाबत जाणीवपूर्वक वरिष्ठ कार्यालयास कुठलाही पत्रव्यवहार केला नसल्याने लाभार्थींना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागले आहे. पारनेर तालुका सतत दुष्काळी भाग आहे.

मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शेतकरी कुटुंबीयांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे.

सर्वसामान्यांना योजनेच्या माध्यमातून आधार देण्याऐवजी तहसिलदार देवरे यांनी अजून संकटात टाकण्याचे काम केले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

मागील दीड वर्षापासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवणार्‍या बेजबाबदार अधिकार्‍यावर कारवाई करून, कर्तव्यात कसूर केल्याने शिस्तभंगाची कारवाई करावी व लाभार्थ्यांना लाभ देण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.