महाविद्यालयात प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मागील सत्रातील गुणांच्या सरासरीतून थेट पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, तसेच त्यांची परीक्षा फी परत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश गोंदकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठविलेल्या पत्रात प्रकाश गोंदकर यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे देशापुढे मोठे संकट उद्भवले आहे.
या संकटामुळे पुढील कालावधीत परीक्षांचे आयोजन कसे करावे? असा प्रश्न विद्यापीठांसमोर उभा आहे. लॉकडाऊन उठविल्यानंतरही या परीक्षांचे नियोजन करणे सोपे नाही. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतरही जनजीवन पूर्वपदावर येण्यास काही कालावधी लागणार आहे.
त्यामुळे विद्यापिठांनी महाविदयालयीन स्तरावर प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्षात प्रवेश द्यावा व विदयार्थ्यांना त्यांच्या मागील सत्रातील गुणांच्या सरासरीनुसार गुणदान देऊन निकाल जाहीर करावा. महाविदयालयामध्ये प्रत्येक विदयाथ्र्याची घेतलेली परीक्षा फी विदयार्थ्यांना परत करावी, असेही पत्रात म्हटले आहे.