अहमदनगर बातम्या

Newasa News : नेवासा शहरातील कर आकारणीचा फेरसर्वे करण्याची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

Newasa News : नगरपंचायत नेवासा खुर्द यांच्यावतीने नेवासा शहरातील नागरिकांना मालमत्ता कर आकारणी बाबत नोटीस देण्यात आल्या आहेत. सदर नोटीसमध्ये बहुतांशी जागेचे व इमारतीचे भांडवली मूल्य,

इमारतीचे वार्षिक कर योग्य मूल्य, तसेच मिळकत कर आकारणी चुकीच्या पद्धतीने काढल्याचा आरोप इंजि. सुनील वाघ, माजी नगरसेवक, भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी केला आहे.

या संदर्भात मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांची भेट घेऊन इंजि. सुनील वाघ, माजी नगरसेवक, भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी त्यांना वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. तसेच ज्या एजन्सी मार्फत हा सर्वे करण्यात आला आहे.

त्यांनी कुठलीही शहानिशा न करता इमारतीचे वय, इमारतीचा घसारा लक्षात न घेता भांडवली मूल्य काढले आहे. त्यामुळे कराची रक्कम वाढलेली दिसत आहे.

तसेच नगरपंचायतीला अग्निशामक गाडी नसताना अग्निशामक कर लावणे, तसेच वृक्ष संवर्धनाचे काम संबंधित ठेकेदाराचे असताना वृक्ष संवर्धन कर लावणे, अशा अनेक मुद्द्द्यावर संबंधित एजन्सीचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर कर प्रणाली दुरुस्त करावी, अशी सूचना केली.

संबंधित एजन्सीचे अधिकारी मुंगसे यांनी यामध्ये लक्ष घालून झालेल्या चुका दुरुस्त करू, असे आश्वासन दिले. जर कर दुरुस्ती झाली नाही, तर या प्रश्नावर शहरवासीयांना घेऊन भारतीय जनता पक्ष मोठे आंदोलन करेल,

असा इशारा इंजि. नगरसेवक सुनील वाघ यांनी दिला. याप्रसंगी मुख्याधिकारी अंबादास गरकळ तसेच मूल्यांकन अधिकारी सर्जे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Newasa news