अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ ठप्प होऊन हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे धंदे बुडाले आहे. तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तू बनलेले सॅनीटायझर, निर्जंतुकी साबण, लिक्विड व मास्कचे भाव वाढले असून, सदरील वस्तू शासनाने सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना मोफत उपलब्ध करुन देण्याची मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हा संपर्क प्रमुख साहेबराव काते यांनी निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांना दिले.
देशामध्ये कोरोना विषाणू हळहळू पसरत आहे. संपुर्ण जगात या विषाणूने थैमान घातले असून, अनेक व्यक्ती मृत्यूमुखी पडले आहे. या विषाणूने मानवी जीवनाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षतेचा उपाय म्हणून सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना सॅनीटायझर, निर्जंतुकी साबण, लिक्विड व मास्क उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. या वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढले असून, ते मिळणे देखील कठिण झाले आहे.
कोरोनामुळे बाजारपेठ ठप्प झाली असून, हातावर पोट असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य नागरिकांना सदर वस्तू खरेदी करुन वापरणे मुश्किल झाले आहे.
प्रशासनाने याची दखल घेऊन आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात घरोघरी सॅनीटायझर, रोग प्रतिबंधक साबण, लिक्विड व मास्क मोफत वाटप करण्याची मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख साहेबराव काते यांनी केली आहे.