अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-सावता परिषदेच्या वतीने पैठण तालुक्यातील थेरगाव (जि. औरंगाबाद) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, निखील शेलार, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, श्री संत सावतामाळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे आदि उपस्थित होते. पैठण तालुक्यातील थेरगाव (जि. औरंगाबाद) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक व माणुसकीला काळिमा फासणारी घडली आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणारे पीडित कुटुंबीय दुर्दैवी घटनेमुळे हादरून गेलेले असून, भयभीत झाले आहे. या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असून, पीडित मुलीला न्याय मिळणे अपेक्षित आहे. यासाठी नराधम जुनेद पठाण व दीपक आहेर या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्यादृष्टीने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.